अवयवदानात कोल्हापूर राज्यात प्रथम क्रमांकावर

कोल्हापूर, दि. १५ : अवयवदान पंधरवडा मोहीम सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत संपूर्ण राज्यभरात एक चळवळ म्हणून राबविली गेली. राज्यात अवयवदानाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवून महाराष्ट्राला या क्षेत्रात आघाडीवर नेऊया, असे आवाहन करीत त्यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्तच्या कार्यक्रमात आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. जास्तीत जास्त नागरिकांनी अवयवदानाचे फॉर्म भरून हयातीतच अवयवदानाची इच्छा नोंदवणे ही एक जबाबदारी बनायला हवी, असेही त्यांनी म्हटले आहे. या कार्यक्रमात आबिटकर यांनी जिल्ह्यातील 117 पैकी 52 उपस्थित अवयवदात्यांना व त्यांच्या नातेवाइकांना प्रमाणपत्र देऊन गौरव केला. कोल्हापूर जिल्हा अवयवदानात प्रथम क्रमांकावर असून नेत्रदानात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
महाराष्ट्रातील नऊ हजारहून अधिक रुग्ण किडनी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षा यादीत आहेत. मी स्वतः 3 ऑगस्ट रोजी प्रथम अवयवदानाचा फॉर्म भरून महाराष्ट्र राज्यात अवयवदानाच्या मोहिमेला सुरुवात केली, असेही प्रकाश आबिटकर यांना सांगितले.
राज्यातील सर्व विभागांतील अनेक शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी अवयवदानाचे फॉर्म भरले आहेत. त्यासाठी सोशल मीडिया जनजागृती मोहीम, अवयवदानावरील ऑनलाइन व्याख्याने, शाळा, माध्यमिक विद्यालये, बाजारपेठा आणि इतर ठिकाणी प्रसिद्धी करण्यात येत आहे. समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सर्व रुग्णालये, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी आणि सामाजिक संस्थांनी जनजागृती करावी, यासाठी आरोग्य विभागामार्फत क्यूआर कोड आणि गूगल लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहेत, असे त्यांनी सांगितले.