बालब्रह्मचारी स्वामींची मतदार यादीत ५० मुलांचे पिता असल्याची नोंद

वाराणसी, दि. १४ : निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांमध्ये चुका होत असल्याच्या तक्रारी वारंवार होत असताना आज आयोगाने केलेला एक अजब गोंधळ उघडकीला आला आहे. उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथील सुप्रसिध्द राम जानकी मंदिराचे संस्थापक स्वामी रामकमल दास ज्यांनी बालपणापासून ब्रम्हचर्य व्रताचे पालन केले आहे त्यांची ५० मुलांचे पिता अशी नोंद मतदार यादीमध्ये करण्यात आली आहे. ही नाव नोंदणी अधिकृत नाही तरी तिचा स्वीकार कसा केला हा प्रश्न आहे.
या वृत्तामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. स्वामी रामकमल यांच्या तथाकथित मुलांच्या नावांची यादीच सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यानुसार स्वामींच्या सर्वात धाकट्या मुलाचे नाव राघवेंद्र दास आहे. तो २८ वर्षांचा आहे. तर सर्वात मोठ्या मुलाचे नाव बनवारी दास असून तो ७२ वर्षांचा आहे,अशी नोंद मतदार यादीमध्ये दिसत आहे.
मतदार यादीतील या गंभीर चुकीवरून राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाला धारेवर धरले आहे. एका व्यक्तीचे नाव पिता म्हणून अनेक वयोगटातील ५० मतदारांच्या नावामध्ये सामील असणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. यावरून मतदार याद्यांमध्ये निवडणूक आयोग वाट्टेल तशा नोंदी करत आहे, हे उघड आहे,अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मारूफ खान यांनी केली. अशा गंभीर चुका वाराणसीमध्ये होऊ शकतात तर इतरत्र का झाल्या नसतील,असा सवालही मारूफ यांनी उपस्थित केला. सोशल मीडियावर काँग्रेसने हा मुद्दा चांगलाच लावून धरला असून या मतचोरीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
SL/ML/SL