दुकाने आणि गाळे विक्रीसाठी MHADA कडून ई-लिलाव

मुंबई, दि. १३ : MHADA आता फक्त घरंच नाही तर मुंबईत स्वस्त दुकानं, व्यावसायिक गाळेही उपलब्ध करुन देणार आहे. म्हाडाकडून एकूण 149 दुकानांचा ई-लिलाव करण्यात येणार आहे. 19 ऑगस्टपासून या ई-लिलावसाठी नोंदणी करण्यासाठी अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे. 25 ऑगस्टपर्यंत अनामत रकमेसह हे अर्ज करता येणार आहेत. तर 29 ऑगस्टला ई-लिलावचा निकाल जाहीर होईल. तर, संगणकीय पद्धतीने बोली लावण्यासाठी 28 ऑगस्टला सकाळी 11 वाजेपासून सुरुवात होईल.
या ई-लिलावात मुंबईतील १७ ठिकाणच्या १४९ दुकानांचा समावेश आहे. यामध्ये गेल्या लिलावात विकल्या न गेलेल्या १२४ दुकानांचाही समावेश आहे. त्यासाठी २३ लाख ते १२ कोटी रुपयांपर्यंतची बोली निश्चित करण्यात आली आहे.
अशी लागेल बोली
ई-लिलावापूर्वी अनामत रक्कम किती भरावी लागेल याची माहिती म्हाडाकडून देण्यात आली आहे. 50 लाखांपर्यंतच्या दुकानांसाठी बोली लावण्यासाठी डिपॉझिट 1 लाख रुपये, 50 लाख ते 75 लाखांपर्यंतच्या दुकानांसाठी 2 लाख रुपये डिपॉझिट, 75 लाख ते 1 कोटीपर्यंतच्या दुकानांसाठी 3 लाख रुपये डिपॉझिट आणि 1 कोटीपेक्षा जास्त किंमतीच्या दुकानांसाठी बोली लावण्यासाठी 4 लाख रुपये इतकं डिपॉझिट भरावं लागणार आहे. यापेक्षा अधिक बोली लावणारा अर्जदार विजेता ठरेल.
SL/ML/SL