ठाण्यात हिंदू-मुस्लिम रक्षाबंधन सोहळा; सामाजिक ऐक्याचा अनोखा संदेश

ठाणे, दि ९: ठाणे नगर पोलीस स्टेशन आणि ‘शिवमुद्रा प्रबोधिनी’ यांच्या संयुक्त विद्यमाने शिवमुद्रा प्रबोधिनी चे अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या पुढाकाराने आज रघुवंशी महाजनवाडी हॉलमध्ये हिंदू-मुस्लिम रक्षाबंधन सोहळा उत्साहात पार पडला. गेल्या १६ वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देणे आणि जातीय सलोखा वाढविणे हा आहे.
या सोहळ्यात परिसरातील मुस्लिम बहिणींनी हिंदू बांधवांच्या हातावर राखी बांधून भावबंधनाचा सन्मान राखला आणि प्रेम, विश्वास व सौहार्दाचा संदेश दिला. रक्षाबंधन हा सण फक्त भाऊ-बहिणींच्या नात्यापुरता मर्यादित नसून परस्परांतील बांधिलकी आणि एकत्रित राहण्याच्या संकल्पाचे प्रतीक आहे, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले.यावेळी दोन्ही समाजातील नागरिक, पोलीस अधिकारी, समाजसेवक आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या विशेष सोहळ्याने ठाण्यात सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र निर्माण केले असून, विविध धर्म व संस्कृतींचा सन्मान करत एकत्रितपणे सण साजरा करण्याचा आदर्श यावेळी घालून दिला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे,आमदार निरंजन डावखरे, समाजसेविका ऋता जितेंद्र आव्हाड, समाजरत्न डॉ नानजी भाई ठक्कर, ठाणा हालाई लोहाणा महाजन ट्रस्टचे अध्यक्ष महेश ठक्कर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे, माजी महापौर स्मिता इंदुलकर, महागिरी जुम्मा मस्जिद चे ट्रस्ट चे अध्यक्ष अनवर मेमन, अखिल भारतीय कोळी समाज अध्यक्ष परेश कोळी, पर्यावरण तज्ञ अशोक NJ, ऍड ज्योती तोशनिवाल, विजय कुमार देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक,तसेच ठाणे नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत चौधरी, पोलीस निरीक्षक डांगे वागळे इस्टेट चर्चचे साजोल फादर व इतर मान्यवर बंधू भगिनी ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीशिवमुद्रा प्रबोधिनी चे अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्यासह साजिद खाकीयानी, भाई सोनावणे, शशी अगरवाल, आशा खाडे, शरद भेलसेकर, जहीरशा खान,अजय पवार, नितीन ठक्कर,अन्वर मेमन, फुरकान सैफी आदींनी विशेष परिश्रम घेतले.AG/ML/MS