पाडळसे (निम्न तापी) सिंचन प्रकल्प आता प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत

मुंबई, दि. ८:- अमळनेर तालुक्यातील (जि. जळगाव) पाडळसे (निम्न तापी) सिंचन प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश करण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्याला 859.22 कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, जलसंपदा विभागाने पाडळसे (निम्न तापी) सिंचन प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन PMKSY-AIBP (वेगवर्धित सिंचन लाभ योजना) योजनेत समाविष्ट करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठवला होता. त्यानुसार केंद्र शासनाने महाराष्ट्रातील निम्न तापी, स्टेज-१ प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना – जलद सिंचन लाभ कार्यक्रम (PMKSY-AIBP) अंतर्गत समावेश केल्याचे आदेश केंद्रीय वित्त मंत्रालयाने निर्गमित केले आहेत. या प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यासाठी एकूण रुपये 2,888.48 कोटी रुपयांची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार केंद्र शासनाने 859.22 कोटी निधी मंजूर केला आहे.
या प्रकल्पासाठी विविध टप्प्यांतील परवानग्या आवश्यक होत्या. प्रारंभी प्रकल्पाच्या तत्त्वतः मान्यतेसाठी तो PIB (Public Investment Board) कडे पाठवण्यात आला. त्यानुसार अर्थ मंत्रालयाकडून आर्थिक दृष्टीने प्राथमिक मंजुरी मिळाल्यानंतर, संबंधित विभागांकडून त्यांच्या टिप्पणी व ना-हरकत प्रमाणपत्रांची पूर्तता झाल्यावर अर्थ मंत्रालयाचे सचिव (खर्च) वुमलुनमांग वुअलनाम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रकल्पास तत्त्वतः मान्यता देण्यात आली आणि पुढील प्रक्रियेसाठी प्रकल्प जलशक्ती मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडून प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे अंतिम आर्थिक मंजुरीसाठी सादर करण्यात आला. अर्थ मंत्रालयाने पूर्ण तपासणी करून अंतिम मंजुरी दिली व प्रकल्प पुन्हा जलशक्ती मंत्रालयाकडे पाठवला. अखेरीस, जलशक्ती मंत्रालयाने या प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन(PMKSY-AIBP) योजनेत समावेश अधिकृत घोषित केला आहे.
या प्रक्रियेमध्ये राज्याच्या जलसंपदा विभागाने सातत्यपूर्ण पाठपुरावा करत या प्रकल्पाचे महत्त्व केंद्र शासनापर्यंत पोहोचवले. केंद्र शासनाच्या निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्राच्या शेती बरोबरच सर्वांगीण विकासाला विकासाला चालना मिळणार आहे. या प्रकल्पासाठी सतत पाठपुरावा सुरू होता. या केंद्र शासनाच्या निर्णयामुळे प्रकल्प पूर्ण होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
या निर्णयासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जलसंपदा मंत्री महाजन यांनी आभार मानले आहेत. अमळनेरच्या खासदार स्मिताताई वाघ यांनी देखील सातत्याने केंद्राकडे यासंदर्भात मागणी केली होती. अमळनेरचे माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांच्याकडून याबाबत पाठपुरावा करण्यात येत होता. या सर्वांच्या सामुदायिक प्रयत्नांना यश मिळाले असल्याचे मंत्री महाजन म्हणाले. ML/ML/MS