या तारखेला निवडले जातील नवीन उपराष्ट्रपती

नवी दिल्ली, दि. ७ : उपराष्ट्रपती धनखड यांनी अचानक दिलेल्या राजिनामान्यानंतर रिक्त झालेले हे पद आता भरले जाणार आहे. भारत निवडणूक आयोगाने २०२५ साली होणाऱ्या उप राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अधिकृत अधिसूचना आज ७ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर केली आहे. ही अधिसूचना “राष्ट्रपती व उपराष्ट्रपती निवडणूक कायदा, १९५२” च्या कलम ४ (१) आणि (४) अंतर्गत जारी करण्यात आली असून ती भारताच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
यानुसार, नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख २१ ऑगस्ट २०२५ (सुट्टीचे दिवस वगळून, दररोज सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत) असून नामांकन छाननी २२ ऑगस्ट २०२५, सकाळी ११ वाजता करण्यात येईल. मतदानाची तारीख (जर गरज भासली तर): ९ सप्टेंबर २०२५, सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत करण्यात येणार आहे.
त्याबरोबर, नामांकनपत्र कक्ष क्र. RS-28, पहिला मजला, संसद भवन, नवी दिल्ली येथे सकाळी ११ ते दुपारी ३ वाजता दरम्यान स्वीकारण्यात येतील. त्याचबरोबर अनामत रक्कम ₹१५,०००/- जमा करता येईल रोख स्वरूपात किंवा रिझर्व्ह बँकेत/सरकारी कोषागारात जमा करता येऊ शकेल. नामांकनासोबत उमेदवाराच्या नावाची मतदार यादीतील अधिकृत नोंद असलेली प्रत, अनामत रकमेची पावती आवश्यक आहे.
उपराष्ट्रपती या पदाकरिताचे मतदान कक्ष क्र. F-101, वसुधा, पहिला मजला, संसद भवन, नवी दिल्ली येथे होईल ही निवडणूक राज्यसभा सचिवालयाचे महासचिव व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या देखरेखीखाली पार पडणार आहे, असे भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.