हत्तीण माधुरीच्या स्थलांतराचा पडसाद आता विदर्भातही..

वाशीम दि ७:– कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी मठात अनेक वर्षांपासून असलेल्या ‘माधुरी ऊर्फ महादेवी’ या हत्तीणेला अलीकडेच ‘वनतारा’ या संस्थेत हलविण्यात आले. स्थलांतरानंतर कोल्हापूरकर आक्रमक झाले होते मात्र अजूनही तिला परत पाठवले नसल्याने आता त्याचे पडसाद विदर्भातही उमटू लागले आहेत. त्याअनुषंगाने आज वाशीम शहरात मूक मोर्चा काढण्यात आला आहे. बालाजी मंदिरापासून सुरू झालेला हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाटणी चौक, अकोला नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
या मोर्चात सर्व समाजबांधव, जीवदया प्रेमी, महिला आणि युवकांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. मोर्चाच्या शेवटी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे निवेदन देण्यात आले. माधुरी ही गेल्या अनेक वर्षांपासून नांदणी मठात होती. तिची देखभाल, उपचार आणि धार्मिक आस्था मठाशी निगडीत असल्याने स्थानिकांमध्ये तिच्याविषयी भावनिक नाते निर्माण झाले होते. त्यामुळे तिचे अचानक स्थलांतर अनेकांच्या अस्वस्थतेचे कारण ठरत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने नागरिकांच्या भावना विचारात घेऊन माधुरी हत्तीला परत आणावे अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे.ML/ML/MS