स्मशान बांधण्यासाठी चोरले कोकण रेल्वेचे रुळ

पिंगुळी दि.५ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वे मार्गावरील पिंगुळी येथे रेल्वेचे रूळ चोरी करून त्याचा वापर तेथीलच एका स्मशानभूमीच्या बांधकामासाठी करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे ही चोरी कोकण रेल्वेच्या काही कर्मचाऱ्यांच्या संगनमतातून झाली असल्याचा आरोप केला जात आहे. चोरीच्या मालातून उभ्या केलेल्या स्मशानाच्या बांधकामाचे बिल घोटाळेबाजांनी राज्य सरकारकडून वसूल केल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेने केला आहे.
या प्रकरणात रेल्वे कर्मचारी व स्थानिक ठेकेदार यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. अधिक धक्कादायक बाब म्हणजे या चोरीवर पांघरून घालण्याचा प्रयत्न रेल्वे पोलिसांनी केल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेने केला आहे. ठाकरेंच्या शिवसैनिकांनी मंगळवारी कणकवलीतील रेल्वे पोलीस ठाण्यात जोरदार आंदोलन केले.
दरम्यान पिंगुळी येथील रेल्वे रुळाची चोरी झाल्याची तक्रार झाल्यानंतर संबंधित स्मशानभूमीतून रेल्वे रूळ हटवण्यात आले आणि त्याऐवजी दुसऱ्या प्रकारचे खांब वापरून काम सुरू ठेवले गेले, असा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी यावेळी केला.
SL/ML/SL