कल्याणच्या लेकीची जागतीक कुस्ती अजिंक्य स्पर्धेसाठी निवड

मुंबई, दि. ४ : आगामी जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठीच्या निवड चाचणीत कल्याणच्या वैष्णवी पाटीलने आपल्या वेगवान खेळाने आणि मॅटवरील वर्चस्वाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिने पुढील महिन्यात झाग्रेब येथे होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी महिलांच्या 65 किलो वजनी गटात राष्ट्रीय संघात आपले स्थान निश्चित केले आहे. त्यासाठी तिने आपल्या प्रतिस्पर्धकांना एकामागून एक चितपट केले आहे. तिच्या डावपेचांची कुशलता आणि मजबूत बचाव पाहता, तिने केवळ चार वर्षेच मॅट कुस्ती खेळली आहे यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. कल्याणमध्ये एका ढाबा मालकाची मुलगी असलेल्या वैष्णवीने कुस्ती खेळणं उशिरा सुरुवात केलं असली तरी ती दुप्पट वेगाने देशाच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचली आहे.
ट्रायलच्या अंतिम फेरीत मुस्कानला 7-2 ने हरवल्यानंतर वैष्णवी म्हणाली, “मी 2020 च्या शेवटी मॅट कुस्ती सुरू केली. त्याआधी मी फक्त मातीची कुस्ती खेळायची. 2026 च्या रिओ ऑलिंपिकमध्ये साक्षी मलिकला पदक जिंकताना पाहिल्यानंतर मी काय करायचे हे ठरवले होते. मला फक्त हाच खेळ खेळायचा होता, असं तिने सांगितलं. ती म्हणाली, “माझे वडील ढाबा चालवतात आणि माझी आई गृहिणी आहे. माझे आई-वडील माझ्यासाठी सर्वकाही करतात. महाराष्ट्रात फार चांगल्या अकादमी नव्हत्या, म्हणून मी हिसारला आले असं ही तिने सांगितले.
बावीस वर्षांची वैष्णवी सुशील कुमार आखाड्यात प्रशिक्षक जसबीर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. वैष्णवी 2016 च्या ऑलिंपिक चॅम्पियन, टोकियो 2021 आणि पॅरिस 2024 खेळांच्या कांस्यपदक विजेत्या आणि सात वेळा जागतिक पदक विजेत्या अमेरिकन कुस्तीपटू हेलेन मारौलिसला आपला आदर्श मानते. ती म्हणाली, “ती एक उत्कृष्ट कुस्तीपटू आहे. मी यूट्यूबवर तिचे सामने पाहते. मला माझ्यासाठी आणि देशासाठी चांगली कामगिरी करायची आहे. मला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकण्याचा पूर्ण विश्वास आहे. शिवाय मला ऑलिंपिक पदक जिंकायचे आहे असं तिने बोलून दाखवलं.