पायाभूत सुविधांचे सुशोभीकरण, मुंबई मेट्रोच्या खांबांचे कलाकृतींमध्ये रूपांतर…

मुंबई दि २ – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आपल्या शहराच्या सुशोभीकरण आणि सार्वजनिक सुविधा उपक्रमात आज एक महत्त्वाचा टप्पा गाठला. मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रोच्या एकूण २,९५५ खांबांपैकी २,५३७ खांबांवर (८६%) संकल्पनाधारित रंगकाम पूर्ण करण्यात आले आहे. ही महत्त्वाकांक्षी पुढाकार योजना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली, तसेच एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या सक्रिय सहभागातून राबवण्यात येत आहे.
या उपक्रमाचा उद्देश शहराचा सौंदर्यवर्धन करणे तसेच मेट्रो मार्गांची ओळख सहज होईल अशा दृश्य संकेतांची निर्मिती करणे आहे. या उपक्रमांतर्गत, मेट्रो मार्गाशी संबंधित खांबांवर विशिष्ट संकल्पना आणि रंगसंगती वापरून रंगकाम करण्यात आले आहे. उदाहरणार्थ, एखादा मेट्रो मार्ग ‘रेड लाइन’ म्हणून ओळखला जात असेल, तर त्या मार्गावरील खांब लाल रंगातील डिझाइनद्वारे सजवले जातील, जेणेकरून त्या मार्गाची ओळख स्पष्टपणे अधोरेखित होईल.
एमएमआरडीएतर्फे राबविण्यात आलेल्या या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहेच, त्याचबरोबर प्रवाशांना सुलभ मार्गदर्शनही होणार आहे. त्यामुळे विविध मेट्रो मार्ग ओळखणे आणि समजून घेणे अधिक सोपे झाले आहे.
मेट्रोच्या एकूण २,९६२ खांबांपैकी २,५३७ खांबांवरील रंगकाम पूर्ण झाले असून उर्वरित खांबांचे काम पावसाळ्यानंतर पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
विविध मेट्रो मार्गिकांवरील कामाचा आढावा खालीलप्रमाणे :
• मेट्रो २बी मार्गिका (डी.एन. नगर – मंडाळे) : एकूण ६५३ खांबांपैकी ६२३ खांबांवरील काम पूर्ण झाले असून, ९६ टक्के लक्ष्य साध्य झाले आहे. केवळ २५ खांबांवर काम बाकी आहे.
• मेट्रो ४ व ४ए मार्गिका (वडाळा – कासारवडवली – गायमुख) : एकूण १०२३ खांबांपैकी ८४१ खांब रंगविण्यात आले असून, ८२ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित १८२ खांबांचे काम बाकी आहे.
• मेट्रो ५ मार्गिका (ठाणे – भिवंडी – कल्याण) : ४८८ पैकी ४३० खांबांवर आकर्षक रंगकाम करण्यात आले असून, ८८ टक्के काम पूर्ण झाले आहे. ५८ खांबांचे काम सुरू आहे.
• मेट्रो ६ मार्गिका (स्वामी समर्थ नगर – विक्रोळी) : एकूण ४२२ पैकी २८८ खांबांच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले असून, ६८ टक्के लक्ष्य साध्य झाले आहे. उर्वरित १३४ खांब रंगवायचे आहेत.
• मेट्रो ९ मार्गिका (दहिसर (पूर्व) – मीरा-भाईंदर) : या मार्गिकेवरील काम अंतिम टप्प्यात असून एकूण ३५४ खांबांपैकी ३२८ खांब रंगवण्यात आले आहेत. ९३ टक्के प्रगती साधण्यात आली असून केवळ २६ खांबांचे काम शिल्लक आहे.
• मेट्रो ७ए मार्गिका (अंधेरी (पूर्व) – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ) : या मार्गिकेवरील सर्व २२ खांब रंगविण्यात आले असून १०० टक्के काम पूर्ण झाले आहे.
मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये आणि शहराच्या सौंदर्यात एमएमआरडीए सातत्याने सुधारणा करत असून, रहिवासी, तसेच पर्यटकांसाठीही अधिक आकर्षक आणि सुलभ शहर घडवण्याच्या दिशेने सातत्याने वाटचाल करत आहे.
या परिवर्तनशील उपक्रमाबद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,
“मुंबई ही स्वप्ननगरी आहे आणि मुंबईच्या पायाभूत सुविधांमधूनही तीच उमेद, ती स्वप्ने प्रतिबिंबित व्हायला हवीत. मेट्रो खांब सुशोभीकरण उपक्रम हा जागतिक दर्जाची सार्वजनिक परिवहन व्यवस्था उभारण्यासोबतच शहराचा चेहराही अधिक आकर्षक, देखणा आणि प्रवाशांसाठी सुलभ करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे द्योतक आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून उपयुक्तता आणि कलात्मकतेची सुंदर सांगड घालण्यात आली असून, मुंबई हे सर्वांसाठी अधिक चांगल्या प्रकारे राहण्यायोग्य आणि आनंददायक शहर म्हणून घडवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.”
उपमुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे म्हणाले,
“मुंबईतील मेट्रो व्यवस्था ही फक्त एक वाहतुकीचे साधन नसून शहराच्या चैतन्याचे प्रतीक आहे. हा खांब सुशोभीकरण उपक्रम म्हणजे शहराच्या सर्वांगीण विकासाबाबत असलेल्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. हा उपक्रम म्हणजे शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये शहराची ओळख गुंफण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक प्रवास अधिक अर्थपूर्ण, आनंददायक आणि मुंबईच्या प्रगतीची व वैशिष्ट्यांची अनुभूती देणारा व्हावा, हा त्यामागचा उद्देश आहे. हा उपक्रम म्हणजे भव्य पायाभूत सुविधा उभारण्यासोबतच नागरिकांचे दैनंदिन जीवन समृद्ध करणासाठी बारकाव्यांवरही लक्ष केंद्रित करणाऱ्या एमएमआरडीएच्या दृष्टिकोनाचे खरेखुरे प्रतीक आहे.”
एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी (भा.प्र.से.) म्हणाले,
*”हा प्रकल्प अत्यंत बारकाईने आणि काटेकोरपणे राबवला जात आहे. यासाठी विविध मेट्रो मार्गिकांवर अचूक नियोजन आणि समन्वयाची गरज आहे. आतापर्यंत २,५३७ खांबांचे काम पूर्ण होणे ही एक मोठी ध्येयसिद्धी असून, आमच्या टीमच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे. रंगानुसार आणि संकल्पनाधारित डिझाइन असलेल्या या खांबांमुळे प्रवाशांना आपले मार्ग ओळखण्यासाठी मदत होईल. त्यामुळे त्यांचा प्रवास अधिक सुलभ होईल आणि शहराच्या एकसंध, सुबक रचनेत भर पडेल.
पावसाळ्यानंतर उर्वरित कामही प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
या उपक्रमाला सर्व नागरिकांनी सक्रिय पाठिंबा द्यावा, असे आवाहन एमएमआरडीएने केले आहे. मेट्रो व्यवस्था ही आपल्या शहराच्या ओळखीचा अविभाज्य घटक आहे आणि हे शहर आपल्या सर्वांचं आहे. त्यामुळे या शहराचे सौंदर्य राखणे आणि खांब खराब होऊ न देणे, ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. या सार्वजनिक मालमत्तेचं सौंदर्य टिकवण्यासाठी तुमचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.
ML/ML/SL