न्यायालयाने फेटाळली ‘अँटिलिया’च्या जमीन विक्रीसंबंधी याचिका

मुंबई, दि. ३१ : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाच्या जमिनीच्या विक्रीला आव्हान देणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. मालमत्तेच्या स्वरूपाचा मुद्दा आधीच निकाली काढण्यात आला आहे. त्यामुळे याच मुद्द्याशी संबंधित जनहित याचिकेत हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट करीत मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याला झटला दिला.
जालना येथील रहिवाशी अब्दुल मतीन यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. २००३ मध्ये अल्टामाउंट रोडवरील अँटिलिया कमर्शियलला ४,५३२.३९ चौरस मीटर भूखंडाची केलेली विक्री रद्द करण्याबाबत निर्देश द्या, अशी विनंती मतीन यांनी याचिकेतून केली होती. जमिन विक्रीत अनियमितता झाल्याचा दावा करीत संबंधित जमीन महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाला परत देण्याची मागणी याचिकेत केली होती. हे प्रकरण २०१७ पर्यंत थंड बस्त्यात पडले होते. त्यानंतर नवीन हस्तक्षेप अर्ज दाखल करण्यात आला. तथापी, जनहित याचिका तसेच हस्तक्षेप अर्जावर कोणताही आदेश देण्यास खंडपीठाने नकार दिला आणि याचिकाकर्त्यांचे आक्षेप फेटाळले.
अँटिलिया निवासस्थान उभी असलेली जमीन मूळतः खोजा समुदायातील मुलांसाठी अनाथाश्रम असलेल्या करिंबोय इब्राहिम खोजा यतिमखाना यांच्या मालकीची होती. ती बॉम्बे पब्लिक ट्रस्ट कायद्यांतर्गत नोंदणीकृत होती. अँटिलिया कमर्शियलने ती वक्फ अधिकारक्षेत्रात येत नसलेल्या धर्मनिरपेक्ष ट्रस्ट म्हणून वर्गीकृत केली होती. २००४ मध्ये महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाने त्या मालमत्तेवर दावा केला, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता. तथापि, व्यवहारापूर्वी सर्व वैधानिक परवानग्या घेण्यात आल्या होत्या, असा दावा अँटिलिया कमर्शियलच्या वतीने करण्यात आला.
SL/ML/SL