विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी, शिक्षण विभागाकडे तक्रार करणार

मुंबई, दि. ३१ : – शाळेत जाणा-या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र ओझे कमी होताना दिसत नाही. एकाच विषयाची दोन ते तीन पुस्तके दररोज शाळेत घेऊन जावे लागत असल्याने विद्यार्थ्यांना पाठदुखीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामध्ये बाहेरील पुस्तकांचा समावेश अधिक असल्याने पालकांना खासगी पुस्तके शाळेतूनच घेणे बंधनकारक केले जात आहे. त्यामुळे पालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या सर्व व्यवहारात शाळेचा आर्थिक फायदा होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. याबाबत ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील हे शिक्षण विभागाकडे तक्रार करणार असून मनमानी करणा-या शाळांवर कारवाई करण्याची मागणी करणार आहे.

राज्य सरकारने अर्थात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम संशोधन मंडळ यांनी एकाच पुस्तकात दोन ते तीन विषय घेऊन विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. मात्र पुस्तक निर्मिती करणा-या अनेक कंपन्याकडून खासगी शाळा पुस्तके विकत घेतात. त्यामध्ये या शाळांना कमीशन मिळत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. राज्य सरकारचे (बालभारती) पुस्तके घेतल्यानंतर बाहेरील पुस्तके विकत घेण्यासाठी शाळा स्वत:च या पुस्तकांची विक्री करीत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शाळेत मुलांना एकाच विषयाचे तीन ते चार पुस्तके घेऊन जावे लागत आहे. इंग्रजी माध्यमात शिकणा-या विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणित, ईव्हीएस, मराठी या विषयांसाठी वर्कबूक, टेक्स्टबूक, इंटिग्रेटेड बूक (बालभारती) अशा प्रत्येक विषयांची तीन ते चार पुस्तके शिवाय त्याच्या सोबत सर्व विषयांच्या वह्या घेऊन जावे लागतात. त्याच बरोबर कंपास बॉक्स, कलर्स बॉक्स, जेवणाचा डबा, पाण्याची बाटली या सारख्या वस्तू ही दफ्तरात असतात. त्यामुळे दफ्तरांचे ओझे पाच ते सहा किलोच्या वरती जाते. अनेक शाळेत तर दप्तराचे ओझे घेऊन तीन ते चार माळे विद्यार्थ्यांना चढावे लागतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाठदुखीचा त्रास होत असून याकडे शाळा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
सर्व शाळांनी बाहेरील पुस्तकांऐवजी शासनाच्या शिक्षण विभागाने तयार केलेल्या पुस्तकांवरच मुलांना शिक्षण द्यावे. बाहेरील पुस्तके घेणे बंधनकारक करु नये. त्यामुळे पालकांना आर्थिक भुर्दंड पडणार नाही. एकाच विषयाचे तास वाढविल्यास मुलांचे दफ्तराचे ओझे कमी होईल. शिक्षण विभागाच्या अधिका-यांनी राज्यातील सर्व शाळांची पाहणी करावी. मुलांच्या दफ्तरांचे वजन करुन पहावे, प्रमाणापेक्षा जास्त दफ्तरांचे वजन असल्यास संबंधीत शाळांवर कारवाई करावी, अशा सुचना खा. संजय दिना पाटील यांनी केल्या असून याबाबत शिक्षण विभागाकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.ML/ML/MS