काळम्मावाडी धरणाचे दरवाजे उघडले, नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा.

कोल्हापूर दि २८:– कोल्हापूर जिल्ह्यातील दुधगंगा नदीवरील काळम्मावाडी धरणाचे पाचही दरवाजे काल सायंकाळी उघडले. त्यामुळे धरणातून २ हजार घनफूट प्रतिसेकंद प्रमाणे पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. या पाण्याच्या विसर्गामुळे कोल्हापूर आणि बेळगांव या सीमेवरील गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता दोन्ही राज्यांच्या प्रशासनाने स्थानिक लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक वाढलेली आहे. धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. धारणातील पाणी पातळी नियंत्रित करणेकरिता धरणाच्या सांडव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे कोल्हापूर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता चेतन माने यांनी सांगितले.
तसंच पावसाचे प्रमाण, पाण्याची आवक यानुसार विसर्ग वाढविणेत येणार आहे. नदीकाठावरील सर्व गावकरी, ग्रामस्थ, शेतकरी यांना विनंती की, नदीपात्रमध्ये उतरू नये, नदीपात्रालगत असणारे साहित्य, जनावरे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करणेत यावीत. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, असंही आवाहन कार्यकारी अभियंता माने यांनी केलं आहे. ML/ML/MS