खांदेरी किल्ल्याजवळ मच्छिमार बोट बुडाली, ३ खलाशी बेपत्ता….

अलिबाग दि २७– रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील शासनाच्या बंदी असलेल्या कालावधीत देखील खवळलेल्या समुद्रात मासेमारीसाठी गेलेली उरण करंजा येथील मासेमारी बोट अलिबाग येथे बुडाली आहे. तुळजाई या नावाच्या बोटी मधील ८ पैकी ५ खलाशी बचावले आहेत तर ३ खलाशी बेपत्ता झाले असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. ५ खलाशांवर अलिबाग येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शासनाने १ जून ३१ जुलै २०२५ या कालावधीत समुद्रातील मासेमारीवर बंदी असल्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी दिनांक २६ जुलै रोजी शासनाने समुद्रात लाल बावटा लावून धोक्याचा इशारा दिला असताना देखील उरण करंजा येथील मासेमारी करण्यासाठी गेलेली बोट अलिबाग येथील समुद्रात बुडाल्याची धक्कादायक माहिती उरण येथील परवाना अधिकारी सुरेश बाबूलगावे तसेच उरणचे तहसीलदार डॉ. उध्दव कदम यांनी दिली आहे.
या अपघातात बोटीवरील ८ पैकी ५ खलाशी बचावले असून त्यांच्यावर अलिबाग येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर ३ खलाशी बेपत्ता झाल्याची माहिती येत आहे. या बोटीवर ८ लोक प्रवास करत होते. यातील ३ जण बेपत्ता आहे. बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरू आहे. तर ५ जण हे पोहत किनाऱ्यावर ९ तासांनी आले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून शोधकार्य सुरू आहे. खांदेरी किल्ल्याजवळ ही घटना घडली आहे. आधीच समुद्राला उधाण आलं असताना मच्छिमाराची बोट समुद्रात गेली होती. खांदेरी किल्ल्याजवळ ही बोट अचानक बुडाली. खडकाळ भागाला आदळून बोट बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या बोटीमध्ये ८ जण प्रवास करत होते. यातील ५ जणांनी जीव वाचवण्यासाठी समुद्रात उड्या मारल्या आणि पोहत सासवणे किनाऱ्यावर आले. घटनेची माहिती मिळताच मांडवा पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. पोहत आलेल्या ५ जणांना अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मांडवा पोलीस समुद्रात बुडालेल्या ३ जणांचा शोध घेत आहे.या दुर्घटनेमध्ये मुकेश पाटील, धीरज कोळी आणि नरेश शेलार हे बेपत्ता झाले आहेत. तर, हेमंत बळीराम गावंड, संदीप तुकाराम कोळी, रोशन भगवान कोळी हे सर्व जण राहणार करंजा येथील बचावले आहे. त्यांच्यासोबत आपटा इथं राहणारे शंकर हिरा भोईर आणि कृष्णा भोईर यांचाही समावेश आहे.
पाचही जणांनी समुद्राच्या किनाऱ्यावर पोहत येऊन आपला जीव वाचवला. मात्र, सोबत असले तिघे मात्र बेपत्ता झाले आहे. तिघांचा शोध सुरू आहे. ड्रोनच्या मदतीने त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. उरण तालुक्यातील करंजा येथील मनोहर गणपत कोळी यांच्या मालकीची तुळजाई नावाची मच्छीमार बोट आज सकाळी ७ वाजता समुद्रात मासेमारी साठी निघाली होती. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास खांदेरी किल्ल्याजवळ आली असता ही बोट लाटांच्या जोरदार माऱ्याने बुडाली. ML/ML/MS