पंतप्रधान मोदींनी मोडला इंदिरा गांधींचा विक्रम

नवी दिल्ली, दि. २६ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याच्या बाबतीत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे. शुक्रवारपासून मोदींचा कार्यकाळ ४,०७८ दिवसांचा झाला असून ते देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर दुसऱ्या स्थानी विराजमान झाले आहेत.
इंदिरा गांधींचा कार्यकाळ २४ जानेवारी १९६६ ते २४ मार्च १९७७ असा ४,०७७ दिवसांचा होता. मोदींनी हा विक्रम मोडला आहे. मोदी यांनी गेली २४ वर्षे अखंड सत्तेत घालवली आहेत. ते २००१ साली गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर सलग १३ वर्षे त्यांनी राज्याचे नेतृत्व केले. त्यानंतर २०१४ मध्ये पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर सलग तीन कार्यकाळात त्यांनी केंद्र सरकार चालवले आहे. नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिले पंतप्रधान आहेत.