कपाशी पिकावर रोगांचा प्रादुर्भाव,मावा, तुडतुडे उठले पिकांच्या मुळावर….

छ. संभाजीनगर दि २६– जिल्ह्यातील सोयगाव शहरासह तालुक्यातील अनेक ठिकाणी कपाशी पिकावर हुमणी पाठोपाठ मर, मावा, तुडतुडे आणि लेडी बई यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. तालुक्यात तब्बल ९,२३३ हेक्टरवरील पिकांवर मावा, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. मर रोगामुळे कपाशीची झाडे सुकू लागली असून, मावा, तुडतुड्यामुळे झाडांची वाढ खुंटत आहे.
पानांतील रस शोषला जात असल्याने फुलोरा आणि बोंड धारणेवर परिणाम होत आहे. त्यामुळे कपाशीवर फवारणी करण्यासाठी शेतकरी सरसावले आहेत. तालुक्यात यंदाच्या हंगामात २५,९४३ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. गेल्या १४ दिवसांपासून पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे आधीच पावसाअभावी पिकांनी माना टाकलेल्या असताना दुसरीकडे अचानक या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने तालुक्यातील कपाशी रोगाच्या विळख्यात सापडली आहे.
शेतकरी स्वखर्चाने विविध कीटकनाशकांची फवारणी करत आहेत; मात्र अपेक्षित परिणाम मिळत नसल्याने ते अधिकच हवालदिल झाले आहेत. कृषी विभागाकडून अद्याप कोणतेही तांत्रिक मार्गदर्शन न मिळाल्यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत. कोणते कीटकनाशक किती प्रमाणात आणि कोणत्या टप्प्यावर फवारावे, याबाबत निश्चित माहिती नसल्याने अनेकांनी चुकीची फवारणी करून नुकसान सोसले आहे.
या पार्श्वभूमीवर स्थानिक शेतकऱ्यांनी, कृषी विभागाच्या तज्ज्ञांनी तातडीने संबंधित गावांमध्ये भेट देऊन कीड-रोग नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना सुचवाव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे यामुळे पिकांचे होणारे नुकसान टळून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळता येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.