प्राचीन शिवमंदिरावरुन दोन बौद्धबहुल देशांमध्ये एअर स्ट्राइक

फ़्नोम पेन्ह,दि. २४ : बौद्ध लोकसंख्या सर्वाधिक असलेल्या कंबोडिया आणि थायलंडमध्ये या दोन देशांमध्ये एका प्राचीन शिव मंदिरावरुन युद्धस्थिती निर्माण झाली आहे. कंबोडिया आणि थायलंडनं एकमेकांवर हल्ले सुरु केले आहेत. यामध्ये आतापर्यंत किमान ९ जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही देशांमधील संघर्ष केवळ गोळीबारापर्यंत थांबलेला नाही. थायलंडच्या सैन्यानं कंबोडियाच्या दोन लष्करी तळांवर हवाई हल्ले केले आहेत.
थाई हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी प्राचीन प्रीह विहार मंदिराजवळील एका रस्त्यावर बॉम्बफेक केल्याची माहिती कंबोडियाच्या संरक्षण मंत्रालयानं दिली. थाई संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते सुरसंत कोंगसिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमेवर किमान सहा भागांमध्ये संघर्ष सुरु आहे. पहिली चकमक गुरुवारी सकाळी थायलंडच्या सुरीन प्रांतात आणि कंबोडियाच्या ओद्दार मीनची प्रांतामधील प्राचीन ता मुएन थॉम मंदिर परिसरात झाली.
प्राचीन प्रेह विहार मंदिर थायलंड आणि कंबोडियाच्या सीमेवर बांधलेलं आहे. भगवान शिवाला समर्पित असलेलं हे मंदिर एक हजारहून अधिक वर्ष जुने आहे. हिंदू मंदिरावरील ताबा सांगण्यावरुनच दोन देश एकमेकांना भिडल्याचं सांगितलं जात आहे. एका टेकडीवर बांधलेल्या या मंदिराचा युनेस्कोच्या यादीत समावेश आहे. तथापि आता थायलंड या मंदिराच्या सभोवतालच्या जमिनीवर आपला हक्क सांगतो. 7 जुलै 2008 रोजी प्रेह विहार मंदिराचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आला. त्यानंतर, मंदिरावरून कंबोडिया आणि थायलंडमधील वाद वाढला. अखेर 2011 मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कंबोडियाच्या बाजूने निकाल दिला.
SL/ML/SL