जेएनयू’मध्ये मराठीचा झेंडा आता फडकणार! मराठी भाषा संवर्धन मंत्री उदय सामंत

मुंबई, दि २३- दिल्लीच्या प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) मराठी भाषेसाठी स्वतंत्र अध्यासन केंद्र असावं, ही कल्पना १७ वर्षांपूर्वी मांडली होती. पण ही कल्पना वर्षानुवर्षं कागदावरच राहिली. अनेक परिपत्रक, बैठका, आश्वासनं झाली. पण प्रत्यक्ष अंमलबजावणी कधीच झाली नाही. मराठी विद्यार्थ्यांच्या मनात एक खोल प्रश्न सतत भिरभिरत राहिला.आपल्या भाषेला इथे स्थान कधी मिळणार?आता अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. आता दिल्लीच्या जेएनयू मध्ये मराठीचा झेंडा फडकणार असून त्या ठिकाणी शिवरायांचा अश्वरूढ पुतळा स्थापन करण्यासाठी जागा उपलब्ध करावी अशी मागणी करण्यात आल्याचे मराठी भाषा संवर्धन मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
मंत्रालयात पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परीषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या रखडलेल्या प्रकल्पाला नवसंजीवनी दिली. प्रलंबित राहिलेलं काहीही अपूर्ण ठेवायचं नाही या त्यांच्या कार्यशैलीनुसार त्यांनी ‘कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासन केंद्रा’चा प्रस्ताव पुन्हा पुढे रेटला आणि केवळ काही महिन्यांत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करत हे केंद्र प्रत्यक्षात आणलं. २४ जुलै रोजी फडणवीस यांच्या हस्ते या केंद्राचं उद्घाटन होणार आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज सामरिक व संरक्षण विशेष अध्यासन केंद्राच्या स्थापनेची कोनशिला समारंभ पार पडणार आहे.‘कुसुमाग्रजांच्या नावाचे मराठी भाषेचे केंद्र सुरू होणे म्हणजे मराठीचा अभिमान आणि अस्मिता यांचाच गौरव आहे. ‘जेएनयू’मध्ये मराठी अध्यासन केंद्र सुरू करण्याचा निर्णय २००५ मध्ये तत्कालीन राज्य सरकारने घेतला होता. परंतु मराठी भाषेसाठी ‘मेळावे’, ‘सभासद संमेलने’, ‘भाषणाचे गाजावाजा’ असे उपक्रम भरपूर झाले. तथापि प्रत्यक्ष धोरणात्मक ठोस निर्णय झाला नव्हता असे सामंत यांनी सांगितले.
महाराष्ट्र सरकारने मराठीसाठी जी ठोस पावले उचलली, ज्या उपाययोजना राबवल्या, त्या प्रत्यक्षात आणताना, त्याचा राजकीय लाभ काय होईल किंवा भाषिक मतांच्या समीकरणांची गणिते मांडण्यासाठी नव्हे. ठाकरे बंधूना निवडणुका जवळ आल्या की मुंबईतील मराठी भाषिकांची आठवण होते आणि मराठी भाषेची गळचेपी होत असल्याचा त्यांना साक्षात्कार होतो. निवडणुका झाल्या की पुन्हा मायमराठीचा विषय ते गुंडाळून बाजूला ठेवून देतात. अशी टिका त्यांनी ठाकरे बंधू वर केली. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या राजकीय विषयावर भाष्य केले.नगरविकास विभागाच्या उधळपट्टीला चाप लावण्यासाठी फडणवीसांना हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. यावर बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, ‘उधळपट्टीला चाप लावण्यासाठी निर्णय घेतल्याचे कुठेही नमूद करण्यात आलेले नाही. हे तिन्ही नेते महायुती म्हणून काम करत आहेत. तिघांच्याही नेतृत्वाखाली नगरविकास खातं चांगलं काम करत आहे. कृषी मंत्री गृहराज्य मंत्री यांच्या विषयी विचारता त्यांनी मुख्यमंत्री सर्व खात्यावर बारीक लक्ष ठेवून असतात असे सांगितले. आम्ही आमच्या आमदरांची कार्यशाळा घेतलेली आहे. असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. KK/ML/MS