महिलांच्या विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय बुद्धिबळपटूंची मोठी कामगिरी

जॉर्जिया,दि. २२ : महिलांच्या विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत सोमवारचा दिवस भारतासाठी दुहेरी पराक्रमाचा ठरला. नागपूरची दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी यांनी बुद्धिबळात भारतीय महिलाही कमी नसल्याचे दाखवून दिले. १९ वर्षीय दिव्या आणि ३८ वर्षीय हम्पी यांनी जॉर्जिया येथे सुरू असलेल्या महिलांच्या विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेची प्रथमच उपांत्य फेरी गाठली. भारतातर्फे प्रथमच दोन महिला खेळाडूंनी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारण्याची किमया साधली.
२०२१पासून महिलांच्या बुद्धिबळ विश्वचषकाला प्रारंभ झाला. यापूर्वी फक्त पुरुषांसाठीच विश्वचषक खेळवण्यात यायचा. यापूर्वी २०२१ व २०२३मध्ये झालेल्या महिलांच्या विश्वचषकात भारताची एकही खेळाडू उपांत्य फेरीपर्यंतही पोहोचली नव्हती. यंदा मात्र भारताच्या चार महिला उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाल्याने त्यांच्यापैकी कोणीतरी नक्कीच इतिहास रचणार, याची खात्री होती. यामध्ये अखेरीस हम्पी व दिव्या यांनी बाजी मारली. द्रोणावल्ली हरिका आणि आर. वैशाली यांचे आव्हान मात्र उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले.
या स्पर्धेतील उपांत्यपूर्व सामन्यात १६व्या मानांकित दिव्याने भारताच्याच १०व्या मानांकित हरिकाला सोमवारी सरळ दोन गेममध्ये पराभूत केले. रविवारी उभय खेळाडूंत पहिला गेम बरोबरीत सुटला होता. मात्र सोमवारी दिव्याने ३-१ अशी बाजी मारली. आता दिव्यासमोर उपांत्य फेरीत चीनच्या तिसऱ्या मानांकित टॅन झोंगोईचे कडवे आव्हान असेल. टॅन ही २०२४मध्ये कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरली होती. त्यामुळे दिव्या तिला रोखणार का, हे पाहणे रंजक ठरेल.
SL/ML/SL