कोकण रेल्वेच्या ‘कार ऑन ट्रेन’ सेवेचे बुकींग सुरू

मुंबई, दि. २१ : यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी कोकणात गावी जाणाऱ्या भाविकांसाठी यावर्षीचा प्रवास काहीसा सुखद होणार आहे. थेट गावाला आपली कार ट्रेनमधून घेऊन जाता येणार असल्यामुळे चाकरमान्यांचा मुंबई-गोवा महामार्गावरचा खडतर प्रवास वाचणार आहे. यासाठीचे आरक्षण आज ( 21 जुलै) पासून खुले झाले आहे. 13 ऑगस्ट पर्यंत बुकींग सुरु राहणार आहे. कोकण रेल्वेने सुरू केलेल्या ‘रो-रो’ सेवेच्या यशस्वी प्रयोगानंतर, आता थेट प्रवाशांसाठी ‘कार ऑन ट्रेन’ ही अभिनव सेवा सुरू होणार आहे. मात्र आर्थिकदृष्ट्या ही सेवा महाग असल्यामुळे कोकण रेल्वेच्या ‘कार ऑन ट्रेन’ या सेवेला किती प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
‘कार ऑन ट्रेन’ ही सेवा येत्या 23 ऑगस्टपासून सुरू करणार आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव चाकरमान्यांसाठी खऱ्या अर्थाने ‘चिंतामुक्त’ प्रवासाचा अनुभव देणारा ठरेल. तसेच प्रवास भाडे सुरवातीला कोलाड (महाराष्ट्र) ते वेर्णा (गोवा) दोन्ही बाजूने फक्त अंतिम स्थानकांकरिता ही सेवा सुरू केली जाणार आहे.
या सेवेसाठी प्रत्येक कारसाठी शुल्क 7 हजार 875 रुपये असणार असून बुकिंग करताना 4000 रुपये (नोंदणी शुल्क) घेतले जाणार आहेत. उर्वरित रक्कम प्रवासाच्या दिवशी जमा करावी लागणार आहे. तसेच स्वतःची कार असल्यास एकाच वेळी चार ते सहा माणसे प्रवास करू शकतात. यासाठी कारसोबत त्याच गाडीमध्ये तिघांना प्रवास करता येणार आहे. तसेच दोन प्रवाशांना 3 टायर एसी कोच मध्ये प्रति प्रवासी 935 रुपये तिकीट रक्कम आकारण्यात येणार आहे. तर तिसरा प्रवासी असल्यास त्यास स्लीपर कोच मध्ये सेकंड सीटिंगच्या प्रवास भाड्यात म्हणजे 190 रुपये आकारून प्रवासाची मुभा देण्यात येणार आहे.
‘कार ऑन ट्रेन’ या सेवेमुळे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे महामार्गावरचा होणारा मनस्ताप तसेच स्वतः इतक्या ड्रायविंग करत लांब पल्ल्याचा प्रवास टाळता येणार आहे. त्यामुळे गणेशोत्सव कालावधीत रेल्वेच्या या कार वाहतूक सेवेला चांगला प्रतिसाद मिळण्याचे अपेक्षा आहे. मात्र आर्थिक दृष्ट्या ही सेवा परवडण्यासारखी नाही. कारण कारने गेल्यास दहा ते बारा हजार रुपयांचे इंधन लागते. तसेच एकाच वेळी पाच ते सहा वेळा कोकणात जाऊन येता शकतात. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या महाग असलेल्या या सेवेला नोकरदार वर्ग कसा प्रतिसाद देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रवासाची वेळ ही सेवा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कोलाड ते गोव्यातील वेर्णा दरम्यान उपलब्ध असेल. या सेवेची सुरुवात कोलाड (महाराष्ट्र) येथून 23 ऑगस्ट 2025 पासून तर वेर्णा (गोवा) येथून 24 ऑगस्ट 2025 पासून होणार आहे. संध्याकाळी 5 वाजता ही गाडी गोव्याच्या दिशेने रवाना होणार असून ती दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता वेर्णा येथे पोहचेल. तर परतीच्या प्रवासातही ती वेर्णा येथून संध्याकाळी 5 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता कोलाड येथे पोहोचेल. प्रवासाच्या आधी तीन तास स्थानकांवर पोहचणे गरजेचे आहे.
SL/ML/SL