आव्हाड,पडळकर यांच्या कार्यकर्त्यावर विषेशाधिकार भंगाची कारवाई

आमदार माजले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्वीग्न सवाल
मुंबई, दि १९ –
विधानभवनात गुरुवारी झालेल्या हाणामारीची गंभीर दखल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज घेतली. जितेंद्र आव्हाड यांच्याबरोबर विधान भवन परिसरात आलेले नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांच्यासमवेत आलेले सर्जेराव टकले यांची चौकशी करून, त्यांच्यावर विशेषाधिकार भंगाची (हक्कभंग) कारवाई केली जाणार आहे. अध्यक्षांनी सदर प्रकरण विधानसभा विशेषाधिकार समितीकडे सुपूर्द केले असून या दोघांवर फौजदारी कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती सभागृहास दिली.
अध्यक्ष नार्वेकर म्हणाले, “जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर या विधानसभा सदस्यांनी देशमुख व टकले या दोन अभ्यागतांना विधान भवनात आणले. त्यांच्या आक्षेपार्ह कृतीमुळे विधिमंडळाची प्रतिमा व प्रतिष्ठा पणाला लागली. या दोन्ही विधानसभा सदस्यांनी सभागृहात याप्रकरणी खेद व्यक्त करावा. तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, याची हमी द्यावी. सभागृहाची प्रतिमा बाधित होईल असे वर्तन सभागृहात व सभागृहाच्या बाहेरही घडणार नाही अशी अपेक्षा आपण सदस्यांकडून बाळगतो”,
आमदारांच्या सुरक्षेसाठी यापुढे अधिवेशन काळात आमदार, त्यांचे स्वीय सहायक आणि शासकीय कर्मचाऱ्यांनाच प्रवेश मिळेल, असे विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केले. गुरुवारी विधिमंडळात मुख्य प्रवेशद्वाराजवळ दोन सदस्यांच्या (आव्हाड आणि पडळकर) अभ्यागतां दरम्यान झालेल्या मारहाणीच्या घटनेची चौकशी विधिमंडळ मुख्य सुरक्षा अधिकारी नेतृत्वात झाली. त्यांचा अहवाल प्राप्त झाला. अहवालानुसार विधिमंडळ ही कारवाई करीत आहे. सर्व सदस्यांनी विधान मंडळाच्या उच्च परंपरेचे पालन करणे, ही घटनात्मक जबाबदारी असल्याचे राहुल नार्वेकर यावेळी म्हणाले.
विधानभवनात गुरुवारी झालेल्या मारामारीच्या घटनेमुळे कुणा एकाची प्रतिष्ठा गेली नाही. सभागृहात बसलेल्या प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा मलिन झाली. आज ज्या शिव्या बाहेर पडत आहेत, त्या एकट्या गोपीचंद पडळकर किंवा जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना पडत नाहीत तर हे आमदार माजले आहेत, असे बोल सर्वांना जात आहेत या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत त्या हाणामारीबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन आमदारांच्या अनुयायांमधील हाणामारीच्या घटनेवर आज सभागृहात निवेदन केले. त्यानंतर भाजप सदस्य गोपीचंद पडळकर यांनी दिलगिरी व्यक्ती केली. ‘अध्यक्षांनी केलेल्या सूचनांचे मी तंतोतंत पालन करेन, १७ जुलैला जी घटना घडली आहे, त्यावर खेद व्यक्त करतो, दिलगिरी व्यक्त करतो’, असे पडळकर म्हणाले. पडळकर यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सदस्य जितेंद्र आव्हाड म्हणाले , नितीन देशमुख हे माझ्यासमवेत आले होते; पण सभागृहात आपण एकटेच येतो. समवेत मी कुणालाही आणत नाही. माझ्यामागे केवळ स्वीय साहाय्यक चालत असतो. त्याच्याशिवाय कुणीही नसतो. त्यामुळे नितीन देशमुख याला मी घेऊन आलो होतो हे रेकॉर्डवर चुकीचे जाऊ नये. ही घटना घडली तेव्हा मी सभागृहात नव्हतो. मी परिसरातही नव्हतो. मी मरीन लाईन्समध्ये होतो. त्यामुळे या घटनेशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष असा कोणताही संबंध नाही. ही घटना घडावी म्हणून मी कुणाला उद्युक्त केले नाही. मी कुणाला खुणावलेही नाही. माझ्या व्हॉट्सॲपवर अत्यंत गलिच्छ भाषेत शिवीगाळ करण्यात आली. मला मारण्याची धमकी देण्यात आली.
अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावर आव्हाड यांना थांबवले. या विषयाचे गांभीर्य या सभागृहातील सर्व सदस्यांनी घेणे आवश्यक आहे. इतर सर्व गोष्टी मला दालनात येऊन सांगितल्या आहेत. सर्व गोष्टींचा विचार करून सुरक्षा रक्षकांकडून अहवाल मागितला; पण या विषयाचे राजकारण करायचे असेल, तर ते योग्य नाही. आपल्याला सभागृहाच्या भावनांचा आदर केलाच पाहिजे.असे नार्वेकर म्हणाले.
दरम्यान अध्यक्ष बोलत असताना ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील हे यावेळी आक्षेप घेऊ लागले. तेव्हा मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले , धमकीचा उल्लेख करण्यास कुणाचीही मनाई नाही; पण विषय काय चालला आहे. जो विषय अध्यक्षांनी मांडला तेव्हा तरी राजकारण नसावे. प्रतिष्ठा काही कुणा एका व्यक्तीची नाही. प्रत्येक गोष्टीचे राजकारण करून विरोधक महाराष्ट्राच्या जनतेला काय सांगणार आहेत.घटनेचे समर्थन होऊ शकत नाही. KK/ML/MS