न्यायालयाने फेटाळली विमानतळानजिकची मांस-मच्छीची दुकाने हटवण्याची याचिका

मुंबई, दि. १८ : राज्यभर अतार्कीकपणे सुरु असलेल्या शाकाहार विरुद्ध मांसाहार वादाला आज न्यायालयाने चपराक लगावली आहे. मुंबई विमानतळासभोवती दहा किलोमीटरच्या परिसरात असलेली मांस-मच्छी विक्रीची बेकायदेशीर दुकाने हटवण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. याआधी हीच मागणी करणाऱ्या दोन याचिका ( दाखल असल्याने नवी याचिका फेटाळत असल्याचे कोर्टाने सांगितले.
अखिल भारतीय कृषी गो सेवा संघ या महात्मा गांधी यांनी स्थापन केलेल्या प्राणीहक्कांसाठी लढणाऱ्या संघटनेने ही जनहित याचिका दाखल केली होती. याचिकेवर मुख्य न्या. अलोक आराधे आणि न्या. संदिप मारणे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
त्या विषयावर दोन जनहित याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यामुळे एकाच विषयावर आणखी एक याचिका दाखल करून घेता येणार नाही,असे म्हणत न्यायालयाने याचिका फेटाळली.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात असलेली अनधिकृत मांस-मच्छीची दुकाने आणि मांसाहारी पदार्थांची विक्री करणारी दुकाने यांचे सर्वेक्षण करण्यासाठी समिती नेमण्याचे आदेश सरकारला द्यावेत,अशी विनंती याचिकाकर्त्याने (petitioners )केली होती.
SL/ML/SL