सीमाभागातील निपाणी शहरात कन्नड भाषेची सक्ती

बेळगाव, दि. १८ : महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये मराठीला हिंदीचे वर्चस्व सहन करावे लागत असल्याने राज्यभरातील वातावरण पेटले आहे. त्यातच आत कर्नाटक सीमाभागात मराठीभाषिकांवर कन्नडचे वर्चस्व प्रस्थापित होत आहे. बेळगाव पाठोपाठ आता जिल्ह्यातील निपाणी (Nipani) शहरातही कन्नड भाषा सक्तीचे प्रयत्न सुरू झाले आहेत.कारण सीमाभागातील निपाणी शहरात दैनंदिन व्यवहार, शासकीय कामकाज तसेच दुकानदार व व्यापाऱ्यांनीही त्यांच्या नामपाट्यांवर ६० टक्के कन्नड व ४० टक्के मराठी भाषेचा वापर करावा,अशा सूचना शासकीय विश्रामगृहात झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत देण्यात आल्या. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी सुभाष संपगावी होते.यावेळी तहसीलदार, महसूल, पोलीस, शिक्षण , नगरपालिका विभागाचे अधिकारी तसेच विविध खात्यांचे प्रमुख उपस्थित होते.
प्रांताधिकारी संपगावी यांनी सांगितले की,राज्य शासनाच्या आदेशानुसार सीमाभागात कन्नड भाषेला प्राधान्य देणे अत्यावश्यक झाले आहे. त्यामुळे सर्व शासकीय कार्यालयांमध्ये तसेच दैनंदिन व्यवहारांमध्ये ६० टक्के कन्नड (60% Kannada) व ४० टक्के मराठी भाषेचा वापर करावा. हे धोरण राबविणे ही सर्व अधिकाऱ्यांची जबाबदारी असणार आहे.सरकारी कार्यालयीन पत्रव्यवहार, लोकांशी संवाद आदी सर्व बाबतीत कन्नड भाषेचा प्रभाव जाणवला पाहिजे,अशी शासनाची भूमिका आहे. व्यापाऱ्यांनी आपल्या दुकाने, हॉटेल, कॅफे आदी आस्थापनांच्या पाट्यांवरही कन्नड भाषेला प्राधान्य द्यावे, असे या बैठकीत सांगण्यात आले.
SL/ML/SL