NCERT पुस्तकात मुघलांच्या इतिहासात मोठे बदल

 NCERT पुस्तकात मुघलांच्या इतिहासात मोठे बदल

नवी दिल्ली, १८ : ‘एनसीईआरटी’ बोर्डाने इयत्ता ८ वीच्या पुस्तकात मोठे बदल केले आहेत. ‘एनसीईआरटी’ने नवीन पुस्तकांमध्ये मुघल बादशाह बाबरचे क्रूर विजेता, अकबराचे सहिष्णू तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा’ म्हणून वर्णन केले असल्याची माहिती मिळाली आहे. मुघलांचा इतिहास आणि मराठ्यांचा इतिहास यांचा समावेश आठवीच्या या नव्या पुस्तकात करण्यात आला आहे.‘एनसीईआरटी’ची ही नवीन पुस्तके बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत.

‘एनसीईआरटी’ने आठवीच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकात बदल केले आहेत. पुस्तकात दिल्ली सल्तनत आणि मुघल काळातील धार्मिक असहिष्णुतेची उदाहरणे दिली आहेत. पुस्तकात बाबरला क्रूर राजा, तर अकबराचे सहिष्णुता आणि क्रूरतेचे मिश्रण असे वर्णन केले आहे. याशिवाय, औरंगजेबाबाबतही पुस्तकात बदल केले आहेत. औरंगजेबाला मंदिरे आणि गुरुद्वारांचा विध्वंसक, असे म्हटले आहे. पुस्तकातील बदलांबाबत अद्याप ‘एनसीईआरटी’कडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. पुस्तकांमध्ये बदल झाल्यानंतर वाद निर्माण होऊ शकतो. हे टाळण्यासाठी ‘एनसीईआरटी’ने एक युक्ती अवलंबली आहे. त्यांनी एक विशेष नोंदही लिहिली आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, भूतकाळातील घटनांसाठी आज कोणालाही दोषी ठरवू नये.

अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती मलिक काफूरने श्रीरंगम, मदुराई, चिदंबरम, रामेश्वरम यांसारख्या मंदिरांवर हल्ले केले. मुघल काळात बौद्ध, जैन आणि हिंदू धर्मांतील मंदिरांमध्ये असलेल्या मूर्ती फोडण्यात आल्या आणि लूट करण्यात आली. बिगर मुस्लिमांवर जिझिया कर लावण्यात आला होता. तसेच त्यांचा मुघलांकडून अपमान केला जात होता. तुम्ही धर्म बदला आणि इस्लाम स्वीकारा, असेही त्यांना सांगितले जात होते. बाबर हा अत्यंत क्रूर शासक होता. त्याने शहरांवर हल्ले करुन लोकांची हत्या केली. महिला आणि लहान मुलांना कैदेत टाकले होते. औरंगजेबाने मथुरा, सोमनाथ येथील मंदिरे आणि जैन मंदिरे तोडली तसेच त्याने शिखांच्या गुरुद्वाऱ्यांवरही हल्ले केले, असे उल्लेख या पुस्तकात करण्यात आले आहेत.

‘रीशेपिंग इंडियाज पॉलिटिकल मॅप’ नावाचा भाग या पुस्तकात आहे त्यात १३ व्या शतकापासून ते १७ व्या शतकापर्यंत काय घडले त्या प्रमुख घटनांचा उल्लेख आहे. दिल्ली साम्राज्य, विजयनगर साम्राज्य, मुघल शासन, शिखांचे आगमन या सगळ्या विषयांचा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे. त्या काळात खेडेगावांची रचना आणि शहरांची रचना कशी होती यावरही हे पुस्तक भाष्य करते. मुघलांच्या सेनेने अनेक गावांमध्ये आणि शहरांमध्ये कशी लूटमार केली, मंदिरे, धार्मिक स्थळे कशी तोडली हेदेखील सांगितले आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *