खासदार संजय दिना पाटील रेल्वे विभागाच्या कामकाजावर नाराज

मुंबई, दि. १८ (प्रतिनिधी) – घाटकोपर होर्डींग दुर्घटनेनंतर त्या ठिकाणी पडलेले भंगार साहित्य व डेब्रिज वर्षानंतरही उचलण्यात न आल्याने रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार दिसून येत आहे. पडलेल्या भंगार साहित्य व डेब्रिज मध्ये पावसाचे पाणी जमा होत असल्याने त्या ठिकाणी मच्छरांचा प्रादुर्भाव होत आहे. परिणामी स्थानिक नागरीकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. डेब्रिज उचलण्याबाबत रेल्वे मंत्रालय सल्लागार समिती सदस्य, खासदार संजय दिना पाटील यांनी पालिकेशी पत्रव्यवहार केला असून त्याबाबत रेल्वे अधिका-यांनी पालिकेला समाधानकारक उत्तर न दिल्याने पालिका प्रशासन रेल्वे विभागाच्या उत्तराची वाट पाहत आहे. त्यामुळे पालिकेला नियमित किटक नाशक फवारणी करता येत नाही.

घाटकोपर होर्डींग दुर्घटनेनंतर पडलेले भंगार साहित्य व डेब्रिजची विल्हेवाट लावण्यात यावी, याबाबतचे पत्र खासदार संजय दिना पाटील यांनी पालिकेला दिले होते. भंगार साहित्य व डेब्रिज मध्ये पावसाचे पाणी साचलेले असून त्यामध्ये डासउत्पती होऊन सभोवताली असलेल्या पोलीस वसाहत तसेच रमाबाई आंबेडकर नगर या परिसरात मलेरिया व डेंगी या आजारांची रुग्ण संख्या माठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्याबाबत नागरीकांच्या तक्रारी आल्यानंतर पालिकेला पत्र पाठवून जाब विचारण्यात आला होता. त्यावर पालिकेने त्या जागेची पाहणी करुन रेल्वे विभागाला पत्र पाठवून खुलासा केला आहे की पडलेले भंगार साहित्य व डेब्रिज उचलण्यासाठी रेल्वे विभागाला गेल्या महिन्यात २४ जून रोजी पत्र पाठविण्यात आले आहे. मात्र त्याबाबत रेल्वे प्रशासनाने काहीही प्रतिक्रीया दिलेले नाही. तसेच दर आठवड्याला या ठिकाणी किटक नाशक फवारणी करण्यात यावी अशी सुचना खासदार संजय दिना पाटील यांनी केली होती. त्यावरही रेल्वे विभागाने पालिकेला उत्तर दिलेले नाही. पालिका आणि रेल्वेच्या पत्रव्यवहारात स्थानिक नागरीकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या दुर्घटनेला वर्ष उलटून ही त्या ठिकाणी भंगार साहित्य व डेब्रिज पडलेले असल्याने रेल्वे प्रशासन करतात काय असा प्रश्न नागरीकांना पडला आहे.ML/ML/MS