भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांत विधिमंडळातच फ्री स्टाईल हाणामारी.

मुंबई, दि १७ : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. अधिवेशनात सत्ताधारी आमदार आणि विरोधक सभागृहात जनतेच्या प्रश्नांसाठी एकमेकांवर आगपाखड करत , आपला मुद्दा आक्रमकपणे मांडत असतात, असे साधारण चित्र आजवर दिसत असे. मात्र आता विधिमंडळात आमदार, मंत्री यांच्या कार्यकर्त्यांची संख्या वाढू लागली आहे. हे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा धक्कादायक प्रकार आज विधिमंडळात घडला. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात गेल्या दोन दिवसांपासून शाब्दिक खटके उडत होते. त्याची परिणिती आज त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीत झालेली पाहायला मिळाली.
“विधानसभेत गुंडाना प्रवेश देणार असाल तर आमचे लोक सुरक्षित नाहीत. मी एक्सवर याबाबत पोस्ट केली आहे. त्यावर मला अश्लाघ्य टीका करण्यात आली. मी सभागृहात भाषण केल्यानंतर मोकळी हवा खाण्यासाठी बाहेर आलो असता माझ्यावर थेट हल्ला करण्यात आला. ते गुंड मलाच मारण्यासाठी आले होते”, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.
शिवसेनाप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या विषयावर नाराजी व्यक्त केली. गुंडगिरी आता विधिमंडळात पोहोचली असल्याचा आरोप त्यांनी केला. “या गुंडांना कुणी प्रवेशिका दिल्या? त्यांची नावे उघड केली पाहिजे. तसेच विधानसभेच्या अध्यक्षांनी हाणामारी करणाऱ्या गुंडांवर आणि त्यांच्या पोशिद्यांवर कारवाई करावी. विधिमंडळ हे लोकशाहीचे मंदिर आहे. इथे जर अशाप्रकारे मारहाण होत असेल तर विधानभवनाचे महत्त्व उरले आहे का? असा प्रश्न निर्माण होतो”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली. AG/ML/MS