शिंदे म्हणाले विरोधकांनी आपल्या डोळ्यावरील धूळ साफ करावी

 शिंदे म्हणाले विरोधकांनी आपल्या डोळ्यावरील धूळ साफ करावी

मुंबई दि १७ — मुंबईला जगाशी जोडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, मुंबईचे सकल उत्पन्न आगामी काळात दुप्पट करण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र विकासाकडे डोळे मिटून पाहिले तर अंधारच दिसेल त्यामुळे विरोधकांनी आपल्या डोळ्यावरील धूळ साफ करावी, सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला हवा, आत्मपरीक्षण करायला हवं असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलं.

नियम २९३ अन्वये विरोधी पक्षाच्या वतीने उपस्थित करण्यात आलेल्या मुंबईसह राज्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न होणे आणि इतर विषयांवर दोन दिवसांपूर्वी उपस्थित करण्यात आलेल्या चर्चेला ते आज उत्तर देत होते. या उत्तरावर प्रत्युत्तराचे भाषण करण्याच्या मुद्द्यावरून दोन्ही बाजूच्या सदस्यांची हमरातुमरी झाल्याने कामकाज दहा मिनिटे तहकूब करण्यात आलं.

सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत याचिका दाखल करण्यात आल्याने त्या स्थगित करण्यात आल्या होत्या , मात्र सर्वोच्च न्यायालयाने आता त्या घेण्याची परवानगी दिली असल्याने त्या घेण्याची सर्व तयारी सुरू करण्यात आली आहे अशी माहिती शिंदे यांनी आपल्या उत्तरात दिली.

असे असले तरी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात विकासकामे फास्ट ट्रॅकवर सुरू आहेत, नवीन गृहनिर्माण धोरणात डबेवाले, महिला या सर्वसामान्य नागरिकांना मदत करण्यासाठी धोरण राबविण्यात येणार आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले.

मुंबईत सुरू असलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास, क्लस्टर विकास योजना , रखडलेले इमारत विकास प्रकल्प , फनेल झोन मधील रखडलेले इमारत प्रकल्प, सफाई कामगारांच्या वसाहती, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचं पुनर्वसन, म्हाडाचे रखडलेले प्रकल्प हे सगळे विषय मार्गी लावण्यात आले आहेत असं सांगत त्यांनी याबद्दलची विस्तृत माहिती सभागृहात दिली.

त्यांचे उत्तर पूर्ण होताच शिवसेना उबाठा च्या भास्कर जाधव यांनी प्रत्यूत्तराचा अधिकार मागितला, यावर अध्यक्षांनी ज्यांनी चर्चेला सुरुवात केली ते आदित्य ठाकरे सभागृहात नाही त्यांच्या व्यतिरिक्त कोणालाही तो देता येणार नाही असं सांगितल्यावर आधी विरोधी सदस्य आक्रमक झाले, त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सत्तारूढ सदस्य जागा सोडून पुढे आले, त्यांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येऊन घोषणा दिल्या. याच दरम्यान आदित्य ठाकरे सभागृहात आले, गोंधळात कामकाज दहा मिनिटे तहकूब करण्यात आलं, कामकाज पुन्हा सुरु झाल्यावर आदित्य ठाकरेंना संधी देण्याचं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं मात्र त्यावेळी ठाकरे सभागृहात नव्हते त्यामुळे कामकाज पुढे सुरू करण्यात आलं. ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *