सत्तारूढ मंत्री , सदस्यांनी काढले विधानसभा कामकाजाचे वाभाडे…

मुंबई दि १७ — विधानसभेत केवळ औपचारिकता पार पाडण्यात येतात का , हे केवळ माहिती देण्याचे नाही तर चर्चेचे सभागृह आहे, कामकाज किती आणि कसे करायचे याची काही पद्धत आहे का असे सवाल आज मंत्री आणि सत्तारूढ सदस्यांनी उपस्थित करत विधानसभा कामकाजाचे वाभाडे काढून सरकारला घरचा आहेर दिला.
विधानसभेचे विशेष सत्र आज सकाळी साडे नऊ वाजता सुरू होईल असं काल कामकाज संपलं तेव्हा जाहीर करण्यात आलं होतं मात्र प्रत्यक्षात ते नऊ वाजता सुरू झालं, यावेळी सभागृहात सदस्यच हजर नव्हते त्यामुळे कामकाज वीस मिनिटे तहकूब करण्यात आलं. यानंतर पुन्हा कामकाज सुरू होताच कार्यक्रम पत्रिकेत दर्शविलेल्या अकरा अर्धा तास चर्चेपैकी केवळ दोनच चर्चा झाल्या, त्यानंतर लक्षवेधी सूचना पुकारण्यात आल्या.
तब्बल अकरा अर्धा तास चर्चा आणि बारा लक्षवेधी सूचना सकाळच्या विशेष सत्रातील पावणे दोन तासात घेणे शक्य आहे का असा सवाल सत्तारूढ सदस्यांनी उपस्थित केला. इथे काय फक्त औपचारिकता पूर्ण करायची का असा सवाल संजय केळकर, योगेश सागर यांनी उपस्थित केला. त्याआधी रात्री बारा वाजता आम्हाला लक्षवेधी सूचना मिळाल्या त्यावर ब्रिफिंग घ्यायचे कधी , अधिकाऱ्यांना घरी जाऊन यायला वेळ नको का, आता इथेच राहायची व्यवस्था करा अशी उद्विग्न मागणी मंत्री उदय सामंत यांनी केली.
यावर अध्यक्षांशी बोलून निर्णय घेतला जाईल असं पिठासीन अधिकारी समीर कुणावार यांनी दिलं. सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते मात्र त्यांनी यावर कोणतेही भाष्य केले नाही, पिठासीन अधिकारी समीर कुणावार यांनी देखील हतबलपणे वेळ मारून नेली, यामुळे विधीमंडळ कामकाजाबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.ML/ML/MS