येमेनी नागरिक बेकायदेशीर ९ वर्षापासून राहतो, पोलिसांना पत्ताच नाही?

मुंबई दि १६:– नंदूरबार जिल्हयातील अक्कलकुवा येथे जामीया इस्लामीया इशातूल उलुम या इस्लामिक धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेत येमेन देशातील व्यक्ती व त्याचे कुटुंबिय व्हिसाची मुदत १९ फेब्रुवारी, २०१६ रोजी संपूनही राहत असल्याची बाब समोर आली आहे. विधानसभेत आमदार देवेंद्र कोठे आणि अनुप अग्रवाल यांनी लक्षवेधीद्वारे सदर प्रश्न उपस्थित केला होता.
सदरहू मदरसा मध्ये बेकायदेशीररित्या राहत असलेल्या व्यक्तीने संस्थेची मदत घेऊन आधारकार्ड, पॅनकार्ड, जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र मिळवले आहे. दरम्यान, उत्तर देताना गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी येमेन चा इसम बेकायदेशीररित्या राहत असल्याची कबुली दिली. या व्यक्तीने बोगस कागदपत्रे तयार केली असून अक्कलकुवा पोलीस स्टेशनमध्ये सदर येमेन देशातील व्यक्ती व मदरसाचे संस्थापक व अध्यक्ष यांच्या विरुध्द फौजदारी गुन्हा दाखल झालेला केला असल्याचे सांगितले.

दरम्यान, गुन्ह्यातील आरोपी मदरसाचे संस्थापक व अध्यक्ष या आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर झाला असून मदरसामध्ये येत असलेल्या विदेशी निधीमुळे राष्ट्राच्या सुरक्षेला धोका पोहचला असल्याचा आरोप उपप्रश्न विचारताना गोपीचंद पडळकर यांनी केला. या संस्थेच्या मेडिकल कॉलेजमध्ये रुग्ण येत नसल्याची वस्तुस्थिती पडळकर यांनी सभागृहात मांडली. त्यांनी संस्थेचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याची मागणी केली. यावर उत्तर देताना राज्यमंत्री पंकज भोयर यांनी मान्यता रद्द करण्यासाठीचे पत्र चॅरिटी कमिशनर कडे पाठवण्यात आले असल्याचे सांगितले. ML/ML/MS