राज्यातील Ola ची 385 शोरूम झाली बंद

मुंबई, दि. १५ : राज्यातील ओला कंपनीच्या 385 शोरूमना टाळं लागलं आहे. राज्याच्या परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे सर्व प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या भरारी पथकांनी केलेल्या ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी सर्व्हिसेस (ओला) कंपनीच्या शोरूम तपासणीमध्ये 432 शोरूमपैकी केवळ 47 शोरूमकडे विक्री परवाना असल्याचे आढळले. त्यामुळे ओलाचे उर्वरित 385 शोरूम बंद करण्यात आल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे.
परिवहन विभागाच्या नियमानुसार, विना नोंदणी वाहने शोरूममध्ये विक्रीसाठी ठेवण्यासाठी ट्रेड सर्टिफिकेट घेणे गरजेचे आहे. मात्र, ओला शोरूमकडे हे प्रमाणपत्र नसल्याने राज्याच्या परिवहन आयुक्त कार्यालयाने त्यांच्याविरोधात कारवाई केली आहे. परिवहन आयुक्त कार्यालयातील सहायक आयुक्त विजय तिराणकर यांनी याबाबत सरकारला कारवाईची माहिती दिली. ओलाच्या शोरूमकडे ट्रेड सर्टिफिकेट नसल्याची तक्रार प्रीतपाल सिंग यांनी केली होती. त्यानंतर केलेल्या तपासणीमध्ये हे प्रमाणपत्र नसलेले शोरूम बंद करण्यात आले आहेत. कंपनीने हे प्रमाणपत्र सादर केल्यावर शोरूम सुरू केली जाऊ शकतात, असे परिवहन आयुक्त कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
SL/ML/SL