रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला, अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती…

मुंबई दि १५:– रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खेड तालुक्यातील जगबुडी, संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री आणि राजापूर तालुक्यातील कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. तर जिल्ह्यातील इतर नद्या दुथडी भरून वाहत आहेत. खेड, दापोली, संगमेश्वर, लांजा, राजापूर आदी तालुक्यांमध्ये मुसळधार पावसामुळे नदी काठच्या परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

याठिकाणी काही भागातील शेती तसेच रस्ते पाण्याखाली गेले आहेत. संगमेश्वर तालुक्यातून वाहणाऱ्या गडनदीला पूर आल्याने माखजन बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याजवळ दरडीचा भाग कोसळला. दरम्यान गेल्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी 114.88 मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाकडून रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून जिल्हा प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले. ML/ML/MS