आटपाडीतील जमीन हडपप्रकरणी मुंबईत आझाद मैदानात विधवेचे आंदोलन.

मुंबई, दि १०
विधवा महिला लाभार्थी पेन्शन सुरु करुन देतो असे आमिष दाखवून खरेदी पत्रावर अंगठ्याचे ठसे उमटून फसवणूक करुन सुमारे १७ एकर शेतजमीन हडपल्याने सांगली जिल्हयातील पडळकरवाडी (ता. आटपाडी) येथील वृद्धा विठाबाई बापू पडळकर (वय ८२) यांनी कुंटूबायासमवेत आझाद मैदानात शुक्रवारपासून आंदोलन सुरु केले आहे. विठाबाई पडळकर म्हणाल्या, विधवा पेन्शन सुरु करुन देतो असे आमिष पोलिस पाटील अमोल उत्तम पडळकर व कैलास जोतीराम वाघमारे यांनी दाखविले. या दोघांनी ३ एप्रिल २०२५ ला आटपाडी नोंदणी कार्यालयात नेले. त्यांनी खरेदी दस्तावर अंगठ्याचे ठसे घेतले. त्यानंतर घरी आणून सोडले.
मला कैलास वाघमारे (रा. झरे ) याने कोणतीही रक्कम दिली नाही. माझी कैलास वाघमारे व अमोल पडळकर (रा. पडळकरवाडी) यांनी फसवणूक केली. सर्व कुटुंब आटपाडी पोलिस ठाण्यात गेलो. तेथे दमदाटी करुन आम्हाला हाकलून दिले व माझी फिर्याद घेतली नाही. कुटंबियांना यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. बाजारभावाने या शेतजमीनीची किंमत सुमारे ३ कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे पडळकर कुटुंबीयांनी सांगितले.
यावेळी विठाबाई पडळकर म्हणाल्या, माझी फसवणूक करुन घेतलेली १७ एकर शेतजमीन परत मिळावी, ही मागणी आहे. मला सरकारने न्याय द्यावा. आंदोलनात संपदा पडळकर, महादेव पडळकर, दाजी पडळकर, सदाशिव पडळकर, विलास पडळकर, किरण पडळकर यांचा सहभाग होता. KK/ML/MS