या आगामी मराठी चित्रपटाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा

 या आगामी मराठी चित्रपटाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा

मुंबई, दि. ८ : मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक अभिमानास्पद घटना ठरली आहे. कोकणातील लोककला, निसर्गसौंदर्य आणि पौराणिक कथांचा संगम असलेल्या ‘दशावतार’ या आगामी मराठी चित्रपटाच्या पहिल्या झलकला आंतरराष्ट्रीय स्तरावर भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध यूट्यूब कंटेंट क्रिएटर्स कोर्बिन माईल्स आणि रिक सीगल (Our Stupid Reactions) यांनी या चित्रपटाच्या टीझरचे विशेष कौतुक केले आहे. त्यांनी टीझरमधील दृश्यसौंदर्य, भव्य नेपथ्य, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि संकल्पनेचे विशेष उल्लेख करत म्हटले की, “हा टीझर एखाद्या हॉलिवूड दर्जाच्या पौराणिक चित्रपटासारखा भासत आहे. मराठी चित्रपट अशा पातळीवर बनत असल्याचे पाहून खूप आनंद झाला”.

हा चित्रपट १२ सप्टेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार असून, त्याच्या प्रदर्शनाची उत्सुकता आता केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता, जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचली आहे. ‘दशावतार’च्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप उमटवली आहे, ही प्रत्येक मराठी माणसासाठी नक्कीच अभिमानास्पद बाब आहे

‘दशावतार’ चित्रपटाची कथा कोकणातील गूढ, थरारक आणि उत्कंठावर्धक पार्श्वभूमीवर आधारित आहे. या चित्रपटात कोकणातील दशावतारी नाटकांचा प्रभाव, स्थानिक लोककला आणि पारंपरिक श्रद्धा यांचा सुरेख संगम आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन सुबोध खानोलकर यांनी केले असून, निर्मिती झी स्टुडिओज्, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस यांनी केली आहे. चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर एका नव्या रूपात झळकणार असून, त्यांच्या भूमिकेबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

चित्रपटाच्या टीझरमध्ये घनदाट जंगलात पाण्यातून धावणारे दृश्य, हातात दिवट्या घेऊन केलेला नृत्याविष्कार, कातळशिल्प, खाणकाम, पौराणिक चित्रे आणि गूढ पार्श्वसंगीत यांचा समावेश आहे. या दृश्यांनी प्रेक्षकांना एका वेगळ्याच विश्वात नेले असून, टीझरचे व्हिडिओज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे, कोर्बिन आणि रिक यांच्या कार्यक्रमात चर्चिला गेलेला ‘दशावतार’ हा पहिलाच मराठी आणि बहुधा पहिला भारतीय प्रादेशिक चित्रपट आहे, ज्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीची झेप आता जागतिक पातळीवर पोहोचत आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *