मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे यांची योग्य सांगड आवश्यक

मुंबई दि ८ — देशाचे ५२ वे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार आज राज्य विधिमंडळाच्या वतीने करण्यात आला, त्यावेळी सर्वसामान्यांना सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळावा यासाठी मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे यांची योग्य सांगड घालणं आवश्यक आहे असे मत गवई यांनी यावेळी व्यक्त केले.
याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते न्या भूषण गवई यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अजित पवार यांच्या सह विधानपरिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, विधानपरिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, विरोधी पक्षनेता अंबादास दानवे आणि दोन्ही सभागृहातील सदस्य उपस्थित होते.
बहुत असो सुंदर संपन्न की महान , प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा अशी सुरुवात करीत न्या गवई यांनी राज्यातील सर्व संत , समाज सुधारक आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण केले.
हा सत्कार म्हणजे महाराष्ट्रातील सर्व जनतेचा आशीर्वाद आहे असे म्हटले.
यावेळी भारतीय राज्यघटना यावर त्यांचे व्याख्यान झाले, संघ राज्यासाठी वेगळी आणि राज्यांसाठी वेगळी घटना असण्याला बाबासाहेबांचा विरोध होता.
एक देश , एक नागरिकत्व हा विचार ही त्यांनीच दिला असे ते म्हणाले. राज्यघटनेतील तीन स्तंभांचे कार्य स्वतंत्र आणि त्यांचे अधिकारही वेगवेगळे . त्यांना प्रत्येकाला अधिकार वाटून दिले मात्र ते घटनेच्या चौकटीत असायला हवेत ही संकल्पना आहे. पुढील पिढीचे प्रश्न काय असतील ते आज सांगता येणार नाही, त्यामुळे त्या त्या वेळी घटना दुरुस्ती करण्याचे अधिकार संसदेला बाबासाहेबांनी दिले आहेत असे न्या गवई म्हणाले. बाबासाहेबांनी ज्या ज्या दुरुस्ती घटनेच्या मसुद्यात दिल्या त्या त्या संसदेने स्वीकारल्या .
केंद्र सरकार कडे जास्त अधिकार दिले जात आहे अशी टीका देखील बाबासाहेबांवर झाली. मात्र केंद्र आणि राज्य दोघांचे ही अधिकार वाटून दिले आहेत त्यामुळे घटना संतुलित ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात आला आहे असं बाबासाहेब म्हणाले होते. मूलभूत अधिकार कायम राहतील , इतर सर्व अधिकार त्यासमोर टिकू शकणार नाहीत अशी तरतूद घटनेत करण्यात आली आहे.
मात्र सामाजिक न्याय मिळण्यासाठी मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्व यांचा समतोल राखण्याचा प्रयत्न करण्याची भूमिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे.
महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महात्मा फुले दांपत्याने शिक्षणाची द्वारे खुली करून दिली. देशाच्या घटनेमुळे आदिवासी महिला राष्ट्रपती पदावर पोहोचली, दोन मागासवर्गीय राष्ट्रपती झाले. अनेक उच्च पदांवर मागासवर्गीय व्यक्ती पोहोचू शकल्या. त्यांच्या विचारांचा पाईक असणाऱ्या मला देखील सरन्यायाधीश पदी संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो असे ते म्हणाले.
भारताची घटना ही देशाची रक्तविहीन क्रांती घडवणारी गोष्ट आहे. मला मिळालेली संधी ही देशवासीयांची सेवा करण्याची संधी आहे. सामाजिक आणि आर्थिक समानता मिळावे हे घटनाकारांचे स्वप्न होते ते साध्य करण्यासाठी माझा प्रयत्न राहील असे सांगत न्या गवई यांनी
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा या महाराष्ट्र देशा
या ओळी उद्धृत करत आपल्या भाषणाचा समारोप केला. ML/ML/MS