देशातील सात प्रमुख शहरांमध्ये घरांच्या विक्रीमध्ये मोठी घट

मुंबई, दि. ७ : २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत देशातील सात प्रमुख शहरांमध्ये घरांच्या विक्रीत तब्बल २० टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. प्रॉपर्टी सल्लागार संस्था अॅनारॉक (Anarock) च्या ताज्या अहवालानुसार, एप्रिल ते जून २०२५ या कालावधीत देशभरात एकूण ९६,२८५ घरे विकली गेली, तर मागील वर्षी याच कालावधीत ही संख्या १,२०,३३५ इतकी होती. ही घट देशातील रिअल इस्टेट क्षेत्रासाठी चिंतेची बाब मानली जात आहे.
या घसरणीचा सर्वाधिक फटका पुणे आणि हैदराबाद या शहरांना बसला आहे. पुण्यात आणि हैदराबादमध्ये अनुक्रमे २७ टक्के घट झाली असून, मुंबईत २५ टक्के, कोलकात्यात २३ टक्के, दिल्ली NCR मध्ये १४ टक्के आणि बंगळुरूमध्ये ८ टक्के घट नोंदवण्यात आली आहे. यामध्ये चेन्नई हे एकमेव शहर ठरले जिथे घरांच्या विक्रीत ११ टक्क्यांची वाढ झाली आहे. चेन्नईमध्ये विशेषतः मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू गृहनिर्माण प्रकल्पांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचे निरीक्षण आहे.
घरांच्या विक्रीबरोबरच नवीन प्रकल्पांची संख्या आणि घरांचा पुरवठाही घटला आहे. २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत केवळ ९८,६२५ नवीन घरे बाजारात आली, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत १६ टक्क्यांनी कमी आहे. मुंबईत नवीन पुरवठ्यात सर्वाधिक ३६ टक्के घट झाली असून, पुण्यात २५ टक्के घट नोंदवली गेली आहे. यामुळे बांधकाम व्यावसायिकांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली आहे.
विशेष बाब म्हणजे, विक्रीत घट असूनही घरांच्या किमती मात्र सातत्याने वाढत आहेत. दिल्ली NCR मध्ये घरांच्या किमतीत २७ टक्के वाढ झाली आहे, तर बेंगळुरूमध्ये १२ टक्के आणि हैदराबादमध्ये ११ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे अनेक संभाव्य खरेदीदारांनी सध्या वाट पाहण्याचे धोरण स्वीकारले आहे, कारण वाढत्या किमती आणि व्याजदरांमुळे गृहकर्ज घेणेही महाग झाले आहे.
या परिस्थितीमागे जागतिक आर्थिक अस्थिरता, युक्रेन युद्ध, इराण-इस्रायल संघर्ष, आणि देशांतर्गत व्याजदरातील चढ-उतार हे प्रमुख घटक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अॅनारॉकचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी सांगितले की, “दुसऱ्या तिमाहीत विक्रीत घट झाली असली तरी, पहिल्या तिमाहीच्या तुलनेत ३ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे बाजारात स्थिरता येण्याची शक्यता आहे.”
सध्या देशातील गृहनिर्माण क्षेत्र संक्रमणाच्या टप्प्यावर आहे. विक्रीत घट असूनही किंमती वाढत असल्याने, पुढील काही महिने खरेदीदार आणि विक्रेत्यांसाठी निर्णायक ठरणार आहेत. घर खरेदीसाठी योग्य वेळ कोणती, याचा निर्णय आता आर्थिक स्थैर्य, व्याजदर आणि स्थानिक बाजाराच्या स्थितीवर अवलंबून असेल.
SL/ML