डेटींग ऍपमुळे वृद्धाने गमावले तब्बल ७३ लाख

 डेटींग ऍपमुळे वृद्धाने गमावले तब्बल ७३ लाख

नवी मुंबई,दि. ७ : वयाच्या ६२ व्या वर्षी एका वृद्धाला डेटिंग अ‍ॅपवर डेट करणं चांगलंच महागात पडलं आहे. या वृद्धाची एका महिलेने तब्बल ७३.७२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. ही घटना न्यू पनवेलमध्ये घडली असून या महिलेविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

PTI ने दिलेल्या वृत्तानुसार, मार्च ते मे २०२४ या काळात या वृद्धाची एका महिलेसोबत डेटिंग अ‍ॅपवर ओळख झाली. यावेळी तिने आपले नाव ‘झिया’ असे सांगितले. या महिलेसोबत सुरुवातीला अ‍ॅपवर बोलणं झालं. त्यानंतर काही दिवसांतच त्यांचं व्हॉट्सॲपवर बोलणं सुरू झालं. या महिलेने सुरुवातीला मैत्री करून वृद्धाचे मन जिंकले. त्यानंतर तिने सोन्याच्या व्यापारात गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल असे आमिष दाखवले. तिने एक खास अ‍ॅप वापरून गुंतवणूक करण्याचाही सल्ला दिला. या आमिषाला भुलून त्यांनी तीन महिन्यांत सुमारे ७३.७२ लाख रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, त्यातून कुठलाच नफा मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी झिया हिला पैसे परत मागितले. त्यानंतर ती अचानक संपर्कातून गायब झाली. पुढे तिने त्यांचे फोन उचलणे बंद केले.

फसवणुकीची जाणीव होताच पीडित वृद्धाने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी ४ जुलै रोजी खांदेश्वर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक), कलम ३४ (सामान्य हेतू) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलिस सध्या त्या महिलेचा शोध घेत आहेत. या महिलेविरुद्ध डिजिटल पुरावे गोळा करत असून घटनेचा तपास सुरू आहे.

SL/ML

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *