हॉटेल ‘व्हिट्स’ प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मुख्यमंत्र्यांची घोषणा…

मुंबई, दि. ७ :–
छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल ‘व्हिट्स’च्या लिलावातील गैर प्रक्रियेचे पडसाद सोमवारी विधान परिषदेत उमटलेले पाहायला मिळाले. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाच्या कंपनीने लिलावात राजकीय दबावाचा वापर केल्याचा आरोप विरोधकांनी केल्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीची घोषणा यावेळी केली.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी लक्षवेधी सूचना मांडत, हॉटेल ‘व्हिट्स’च्या खरेदी व्यवहारात नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप केला होता. त्यावर, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निविदा प्रक्रिया रद्द झाली असल्यामुळे आता लक्षवेधीला अर्थ उरत नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, बावनकुळे यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने दानवे यांनी काही मुद्दे उपस्थित करीत आरोप केले. ते म्हणाले की, या खरेदी व्यवहारात नियमांचे उल्लंघन झाले असून, या कंत्राटात सहभाग घेतलेल्या तीन कंपन्यांच्या कंत्राटामध्ये फक्त पाच-पाच कोटींचा फरक आहे. त्यामुळे या व्यवहारात गैरप्रकार झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
निविदा प्रक्रियेत सहभागी झालेल्या कंपनीचे मालक सिद्धांत शिरसाट असून, त्यांचे वडील राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. त्यांच्या वडिलांच्या निवडणूक शपथपत्रात सिद्धांत शिरसाट यांच्या नावावर कसलीही संपत्ती नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. याचा अर्थ जी कंपनी नोंदणीकृतच नाही, कंपनीने मागील तीन वर्षांचा आयटीआर भरलेला नाही, सिद्धांत शिरसाट यांच्या वडिलांच्या शपथपत्रात त्यांची मालमत्ता शून्य असेल, तर ते हॉटेल कसे काय विकत घेऊ शकतात? असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला.
काँग्रेसच्या भाई जगताप यांनीही यावर तीव्र आक्षेप घेत, “जी कंपनी नोंदणीकृतच नाही, त्या कंपनीने निविदेत सहभाग कसा घेतला?” असे विचारले. तर शशिकांत शिंदे यांनी संबंधित प्राधिकरणात अधिकाऱ्याला निलंबित करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.अनिल परब यांनी, संपूर्ण निविदा प्रक्रिया रद्द का केली आणि इतर सहभागी कंपन्यांचा विचार का केला नाही, असे प्रश्न उपस्थित केले.
विरोधकांची घोषणाबाजी
हॉटेल व्हिट्स खरेदी प्रकरणात संजय शिरसाट यांचे नाव आल्यामुळे त्यांना सभागृहात बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. मात्र, ही गोष्ट नियमानुसार नसल्याचे सांगत विरोधकांनी घोषणाबाजी केली. संजय शिरसाट राजीनामा द्या…, सभापती न्याय द्या अशी मागणी करीत विरोधकांनी शिरसाट यांना बोलण्यास विरोध दर्शवला. मात्र संजय शिरसाट यांनी विरोधकांच्या गोंधळात आपले म्हणणे मांडले.
विरोधकांचा गोंधळ सुरू असल्याने शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर द्यायला उभे राहिले. हॉटेल व्हिट्स खरेदी प्रकरणाची निविदा प्रक्रिया रद्द झाली आहे. परंतु निविदा प्रक्रियेत जी अनियमितता झाली आहे, त्याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ML/ML/MS