भंडारदरा धरण परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग

अहिल्यानगर दि. ७ — जिल्ह्यातील भंडारदरा परिसरात पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केल्याने आदिवासी जन जीवन विस्कळीत झाले आहे. तसेच भागातील चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या भागात भात पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे. थंडी वाऱ्यामुळे जनावरेही गारठली आहेत. असाच पाऊस पडत राहिला तर जनावरही दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला असून आज रोजी भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 72 टक्के झाल्याने तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान चांगल्या प्रकारे होत आहे. जलाशय परिचलन सूची नुसार पाणीपातळी नियंत्रित ठेवणे करीता भंडारदरा धरणातून पाणी सोडण्यात आले असून 8740 क्यूसने विसर्ग प्रवरा नदीत सोडला आहे.निळवंडे धरणात पाणी जमा होत .असून पाण्याची आवक वाढल्यास अजून जादा पाणी सोडनेत येईल असे शाखा अभियंता प्रवीण भांगरे यांनी सांगितले.
सकाळपासून पुन्हा एकदा पाऊस संततधार पडत होता त्यामुळे ओढे नाले पुन्हा दुथडी भरून वाहू लागले. धरणामधून पाणी सोडण्यात आल्यामुळे निळवंडे धरणाचा पाणीसाठा वाढत असून धरण 80% टक्के भरले.आज निळवंडे धरणातून सकाळी ९ वाजता 6570 क्युसेस ने विसर्ग सुरु केल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे .
पावसाचे प्रमाण लक्षात घेता पुढील काही तासांत विसर्ग टप्याटप्याने वाढण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे प्रवरा नदीपात्रात पाणीपातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या अकोले, संगमनेर, ओझर बंधाऱ्याखालील गावांसह राहाता, राहुरी, श्रीरामपूर आणि नेवासा तालुक्यातील सर्व नदीकाठच्या गावांना व वस्त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रात ठेवलेले जनावरं व तत्सम साहित्य तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात उतरणे अथवा उशिरा हालचाल टाळावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ML/ML/MS