दीपिका पदुकोणला हॉलिवूडकडून विशेष सन्मान

अभिनेत्री दीपिका पदुकोणने भारतीय सिनेसृष्टीबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली वेगळे स्थान निर्माण केले आहे. याची दखल घेत दीपिकाचा ‘हॉलिवूड वॉक ऑफ फेम’ मध्ये समावेश करण्याचा मान मिळाला आहे. हा सन्मान मिळवणारी ती पहिली भारतीय सेलिब्रिटी ठरली आहे. २०२६ मध्ये ‘वॉक ऑफ फेम’वर सन्मानित होणाऱ्या कलाकारांच्या यादीत दीपिकाच्या नावाची अधिकृत घोषणा बुधवारी हॉलिवूडमधील एका पत्रकार परिषदेत करण्यात आली. या प्रतिष्ठित यादीत मायली सायरस, टिमोथी चालमेट, एमिली ब्लंट, राहेल मॅकअॅडम्स आणि सेलिब्रिटी शेफ गॉर्डन रॅमसे यांचाही समावेश आहे.
हॉलिवूड वॉक ऑफ फेम हे लॉस एंजेलिस, कॅलिफोर्नियातील एक प्रतिष्ठित फूटपाथ आहे. या ठिकाणी चित्रपट, संगीत, टेलिव्हिजन, रेडिओ आणि थिएटर क्षेत्रात अतुलनीय योगदान दिलेल्या कलाकारांना पाच स्टारच्या स्वरूपात सन्मानित केलं जातं. 1960 साली सुरू झालेल्या या परंपरेत आतापर्यंत २,७०० हून अधिक कलाकारांना हा गौरव मिळाला आहे.