प्रभाग रचना करताना “आय टू आर” चा विचार करा – इंदिसे
वाढलेल्या लोकसंख्येनुसार प्रभाग संख्या वाढवा
सर्वच पालिकांमध्ये अनुसूचित जातीचे प्रभाग पाचने वाढवा

 प्रभाग रचना करताना “आय टू आर” चा विचार करा – इंदिसेवाढलेल्या लोकसंख्येनुसार प्रभाग संख्या वाढवासर्वच पालिकांमध्ये अनुसूचित जातीचे प्रभाग पाचने वाढवा

ठाणे – उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गेले तीन ते सहा वर्ष रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, सन 2017 प्रमाणे प्रभाग रचना करण्यात येणार आहे. वाढते नागरीकरण आणि त्यामुळे वाढलेल्या लोकसंख्येचा विचार करता, अशा पद्धतीची प्रभाग रचना अन्यायकारक ठरणार आहे..त्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रभागांची संख्या वाढवावी तसेच प्रत्येक महानगर पालिकेत अनुसूचित जातीच्या प्रभागांची संख्या पाचने वाढवावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया – एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांनी पत्रकार परिषदेत केली. या बाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांची भेट घेतली असून त्यांनीही या मागणीबाबत अनुकूलता दर्शविली असल्याचेही इंदिसे यांनी सांगितले.
विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर प्रभाग रचना करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. ही प्रभाग रचना सन 2017 च्या अनुषंगाने करण्यात येणार असल्याची चर्चा असल्याने त्यावर नानासाहेब इंदिसे यांनी आपली भूमिका पत्रकार परिषदेत मांडली. यावेळेस प्रदेशाध्यक्ष विकास निकम हे देखील उपस्थित होते.
इंदिसे म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने १० जून रोजी महाराष्ट्रातील महानगरपालिका यांच्या निवडणूका सन २०१७ च्या प्रमाणे प्रभाग रचना करणेत येईल असा अद्यादेश काढलेला आहे, तो बहुतांशी महानगरपालिकेतील जनता, मतदार, लोकप्रतिनिधी व अनुसुचित जातीच्या वर्गावर अन्याय करणारा आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, मिरा-भाईंदर, नवीमुंबई, वसई-विरार, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, कोल्हापूर, सोलापूर, सांगली-कुपवाड इत्यादी महानगरपालिका परिक्षेत्रात नागरीकरण वाढलेले आहे. या महानगरपालिकेतील लोकसंख्या व मतदारसंख्या या १४ वर्षात दीडपटीने वाढलेली आहे.


ठाणे शहराचा विचार केल्यास, ठाणे महानगरपालिका क्षेत्र हे पुर्वी “इंडस्ट्रीयल झोन” होते, ते आता “आर झोन” झाले आहे. त्यामुळे इंडस्ट्रीयल मालक हे बिल्डर लाईनमध्ये विकासक म्हणून काम करीत असल्यामुळे रहिवाशी संख्या दुपटीने वाढली आहे. ठाणे शहराच्या वर्तकनगर विभागात म्हाडाच्या जागेत ७० इमारती १+ ४ मजली होत्या. त्यामध्ये पूर्वी ४० कुटुंबिय राहत होते. आता त्याच ठिकाणी टाॅवर उभे राहिल्याने १०० कुटुंबे राहतात. शिवाईनगर पोखरण रोड नं.१ वसाहतसुध्दा म्हाडा व देविदयाल कंपनीत वसलेली आहे. तेथेही २० मजली इमारतीचे बांधकाम चालू आहे. देशातील नामांकित रेमंड कंपनीत ही ४० ते ५० मजली पेक्षा जास्त अशा टोलेजंग १० इमारती उभ्या राहिल्या आहेत व उर्वरित जागेत बांधकाम चालु आहे. त्याचप्रमाणे पोखरण रोड नं. २ ठाणे मधील वसंतविहार, पवारनगर, गांधीनगर, सुभाषनगर, सिध्दांचल या सर्व ठिकाणी औद्योगिक वसाहतींवर निवासी बांधकामे होत आहेत. उपवन रोड, घोडबंदर रोड, कोलशेत, बाळकुम, ब्रम्हांड, हिरानंदानी, वागळे इस्टेट परिसर या ठिकाणी टोलेजंग इमारती तयार झालेल्या आहेत. प्रामुख्याने लहान छोट्याशा दिवा गावाचीही लोकसंख्या सुमारे ४ ते ५ लाखापर्यंत झाली आहे. त्यामुळेच ठाणे महानरपालिका परिक्षेत्राची लोकवस्ती सन २०११ च्या शिरगणतीच्या दुपट्टीने वाढलेली आहे. सर्वसाधारण लोकसंख्येप्रमाणेच अनुसुचित जातीची लोकसंख्या वाढलेली आहे. पूर्वी ठाणे महानगरपालिकेत सात अनुसुचित जातीचे नगरसेवक होते वाढत्या लोकसंख्येनुसार ते नगरसेवक अनुसूचित जातीच्या नगरसेवकांची संख्या १०च्या पुढे असणे आवश्यक आहे. सन २०१७ प्रमाणे प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हा निर्णय जनता, मतदार, लोकप्रतिनिधीसाठी अन्यायकारक आहे. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करावा, अथवा मध्यम कायदेशीर पर्याय शोधावा व संबंधित जनतेला, मतदारांना, लोकप्रतिनिधींना न्याय द्यावा, अशी मागणी आपण केली असल्याचे नानासाहेब इंदिसे यांनी सांगितले. AG/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *