नाना पटोले निलंबित, विरोधकांचा कामकाजावर बहिष्कार….

मुंबई दि १– भाजपाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी आणि कृषिमंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्ये करून शेतकऱ्यांचा अपमान केला आहे त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी करत अध्यक्षांकडे धाव घेत राजदंड उचलण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसच्या नाना पटोले यांना अध्यक्षांनी दिवसभरासाठी निलंबित केलं. यावर निषेध व्यक्त करत विरोधी पक्षांनी सभात्याग केला आणि कामकाजावर बहिष्कार घातला.
पटोले यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून ही मागणी केली होती, यावर ते आक्रमक होत अध्यक्षांच्या आसनाकडे गेले आणि त्यांनी राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे इतर सदस्य ही अध्यक्षांच्या आसनाकडे गेले. यावर दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाली,यामुळे अध्यक्षांनी कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब केलं होतं. यानंतर कामकाज पुन्हा सुरू होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पटोले यांनी अध्यक्षांकडे धावून जाणे , त्यांच्या अंगावर जाणे योग्य नाही, त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली. त्यावर अध्यक्षांनी राजदंडाला हात घातला म्हणून पटोले यांना दिवसभरासाठी निलंबित केलं. त्यानंतर पुढील कामकाजात विरोधी सदस्य सहभागी झाले नाहीत. ML/ML/MS