दिल्लीतील सर्व पेट्रोल पंपांवर EoL वाहनांना मिळणार नाही इंधन

दिल्ली सरकारने वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं आहे. १ जुलै २०२५ पासून दिल्लीतील सर्व पेट्रोल पंपांवर सेवा-मुदत संपलेली म्हणजेच “एंड-ऑफ-लाईफ” (EoL) वाहने इंधन भरू शकणार नाहीत. Commission for Air Quality Management (CAQM) च्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी अत्यंत कडक पद्धतीने केली जाणार आहे. ही बंदी १५ वर्षांपेक्षा जुनी पेट्रोल वाहनं आणि १० वर्षांपेक्षा जुनी डिझेल वाहनं यांच्यावर लागू होणार आहे.
वाहतूक विभाग, दिल्ली पोलीस, ट्रॅफिक पोलीस आणि दिल्ली महानगरपालिका (MCD) या सर्व विभागांनी मिळून एक समन्वित योजना तयार केली आहे. इंधन पंपांवर विशेष पथकं तैनात करण्यात आली असून, पहिल्या १०० पंपांवर दिल्ली पोलीस यांची नजर राहणार आहे, तर क्रमांक १०१ ते १५९ या पंपांवर वाहतूक विभागाच्या ५९ खास टीम्स नियुक्त करण्यात आल्या आहेत. MCD च्या टीम्सही पेट्रोल पंपांवर नियमित तपासणीसाठी सज्ज आहेत.
हा निर्णय घेण्यामागे प्रमुख हेतू म्हणजे प्रदूषणात लक्षणीय घट करणे आणि पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देणे. जुनी वाहने वातावरणात हानिकारक धूर आणि कण सोडतात, त्यामुळे त्यांना हद्दपार करून सार्वजनिक आरोग्य सुधारण्याचा सरकारचा उद्देश आहे. नागरिकांनी आपल्या वाहनाच्या नोंदणीची वैधता तपासावी आणि वाहन सेवा-मुदतीच्या बाहेर गेले असल्यास त्याचा वापर थांबवावा किंवा त्याच्याबाबत योग्य त्या उपाययोजना कराव्यात.