इराण-इस्रायल युद्धात अमेरिकेची उडी

तेहरान : इराण-इस्रायल युद्धात अनेक दिवसांपासून केवळ बघ्याची भूमिका घेणाऱ्या अमेरिकेने रविवारी उडी घेतली. अमेरिकेने इराणमधील फोर्डो, नतांज आणि इस्फहान येथील अणुकेंद्रावर रविवारी सकाळी ४.३० वाजता (भारतीय वेळेनुसार) हल्ला केला. या हल्ल्याचे पडसाद जगभरात उमटत असून रशिया, चीन, कतार, सौदी, पाकिस्तान आदी देशांनी अमेरिकेच्या या कारवाईचा निषेध केला आहे. या कारवाईनंतर इराण संतापला असून या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची घोषणा त्यांनी केली. यामुळे जागतिक पातळीवर संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
इराणवरील हल्ल्यानंतर १३ तासांनंतर अमेरिकेच्या ‘जॉइंट चीफ ऑफ स्टाफ जनरल’ डॅन केन यांनी माहिती देताना सांगितले की, इराणमधील मोहिमेचे नाव ‘ऑपरेशन मिडनाइट हॅमर’ होते. यात १२५ विमाने सामील होती. त्यात ७ ‘बी-२’ स्टेल्थ बॉम्बर्स विमानांनी इराणच्या अणुकेंद्रावर हल्ला केला. इराणमधील फोर्डो, नतांज आणि इस्फहान येथे १४०० किलो वजनाचे बंकर बॉम्ब टाकण्यात आले, तर इस्फहान अणुकेंद्रावर टॉमहॉक क्षेपणास्त्रे डागली गेली. या मोहिमेत इराणला पूर्ण चकवा देण्यात आला. काही विमाने प्रशांत महासागराद्वारे रवाना करण्यात आली. त्यामुळे इराणला वाटले हल्ला तिथून होणार आहे. मात्र, खरा हल्ला दुसऱ्या दिशेने करण्यात आला. ही मोहीम पूर्णपणे गुप्त ठेवली होती. त्याची माहिती ठरावीक लष्करी अधिकाऱ्यांना होती. इराणी सैन्य व नागरिकांचे या हल्ल्यापासून कोणतेही नुकसान झाले नाही, असे ते म्हणाले.
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची म्हणाले की, अमेरिकेला केवळ ताकद व धमकीची भाषा समजते. त्यांना आंतरराष्ट्रीय कायद्याची पर्वा नाही. आम्ही अमेरिकेच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणबरोबरच आपल्या देशातील नागरिकांचा विश्वासघात केला आहे. त्यांनी नेत्यानाहू यांचे ऐकून हल्ला केला. नेत्यानाहू हे आपल्या फायद्यासाठी दुसऱ्या देशावर हल्ले करत असतात. इराण पाश्चिमात्य देशांवर कधीच विश्वास ठेवत नाही, असेही त्यांनी नमूद केले.
सोमवारी आपण रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेणार आहोत. रशिया व इराण हे मित्र असून दोघांमध्ये सामरिक भागीदारी आहे. दोघेही एकदुसऱ्याचा सल्ला घेऊन निर्णय घेतात. इराणच्या अणुकरारावर स्वाक्षरी करणारा रशिया हा देश आहे, असे अराघची यांनी सांगितले.