श्री संत रोहिदास पायी दिंडी क्रमांक २४ चे गेटवे ऑफ इंडिया येथून पंढरपूरकडे भव्य प्रस्थान

 श्री संत रोहिदास पायी दिंडी क्रमांक २४ चे गेटवे ऑफ इंडिया येथून पंढरपूरकडे भव्य प्रस्थान

मुंबई, ७ जून २०२५ — वारकरी परंपरेचा जागर करणाऱ्या श्री संत रोहिदास पायी दिंडी क्रमांक २४ चा भव्य प्रस्थान सोहळा आज गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथून भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला. श्री पांडुरंग प्रतिष्ठान आणि श्री संत रोहिदास सेवा मंडळ, काळा किल्ला, धारावी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे ही दिंडी पंढरपूरच्या दिशेने पायी प्रवासासाठी रवाना झाली.

ही दिंडी १९७८ साली संस्थापक ह.भ.प. पांडुरंग कारंडे महाराज (कराडकर) यांनी सुरू केली. यंदा या पंढरपूर वारीच्या ४८ व्या वर्षाचे औचित्य साधण्यात आले आहे. परंपरेने जोपासलेली ही आध्यात्मिक वारी आजही श्रद्धा, निष्ठा आणि भक्तिभावाने तेवढ्याच निष्ठेने पार पाडली जात आहे.

प्रस्थानप्रसंगी दिंडीप्रमुख ह.भ.प. चंद्रकांत कारंडे, पांडुरंग प्रतिष्ठानचे डॉ. शांताराम कारंडे, तसेच दिंडी अध्यक्ष ह.भ.प. नारायण पाटील महाराज यांची उपस्थिती लाभली. विशेष म्हणजे राज्याचे रोजगार व कौशल्य मंत्री मा. मंगलप्रभात लोढा यांनी देखील या दिंडीस साक्षीदार होत उपस्थिती दर्शवली, यामुळे भक्तांमध्ये विशेष उत्साह निर्माण झाला.

मुंबईतील विविध भागांतून आलेल्या शेकडो वारकरी भक्त टाळ-मृदुंगाच्या गजरात, “ज्ञानोबा-तुकाराम” च्या जयघोषात, विठूनामाच्या अभंगगायनात सहभागी होत पायी वारीस प्रारंभ केला.

दिंडीचा पहिला मुक्काम श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, वडाळा येथे झाला असून, पुढील मुक्काम अनुक्रमे धारावी काळा किल्ला, मानखूर्द, आणि वाशी येथील जागृत शिवमंदिर येथे असणार आहेत. एक महिन्याच्या या भक्तिमय प्रवासानंतर दिंडी आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी वाखरी येथे पोहोचणार आहे.

ऊन, वारा, पावसाचे आव्हान स्वीकारत, प्रेम, निष्ठा आणि समर्पणाने ही वारी पुढे सरकते. ही केवळ पायी वारी नाही, तर ती एक आध्यात्मिक चैतन्ययात्रा आहे. “पाऊले चालती पंढरीची वाट…” या गजरात आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या जयघोषात भक्त हरवून जातात.

श्री पांडुरंग प्रतिष्ठान यांच्या वतीने मुंबईतील सर्व भाविक भक्तांना या दिंडीत सहभागी होऊन अध्यात्मिक लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *