‘FCRA’ प्रमाणपत्र प्राप्त करणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा देशातील पहिलाच कक्ष

 ‘FCRA’ प्रमाणपत्र प्राप्त करणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा देशातील पहिलाच कक्ष

नाशिक दि १– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष’ अंतर्गत आयोजित ‘जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा’ आज नाशिक येथे उत्साहात पार पडली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी सांगितले की, “मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष अनेक वर्षांपासून अस्तित्वात होता, परंतु 2014 पासून या निधीचा वैद्यकीय मदतीसाठी प्रभावी वापर करण्याचा संकल्प करण्यात आला. अनेक वेळा शासनाच्या योजनांच्या मर्यादा असतात, अशा वेळी गरजू नागरिकांना थेट मदत आवश्यक असते, हे या उपक्रमातून समजून आले.”

धर्मादाय रुग्णालयांनी लाभ घेत असतानाही रुग्णांना मदत न केल्याचे अनेक वेळा आढळून आले. म्हणूनच 2022 मध्ये धर्मादाय रुग्णालयांनाही या यंत्रणेत समाविष्ट करण्यात आले. यामुळे आता शासकीय योजना व निधी यांचा समन्वय साधून रुग्णांना अधिक प्रभावी आणि सुलभ सेवा देता येणार आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, “मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची पुनर्रचना करण्यात आली असून, ही यंत्रणा आता जिल्हा स्तरावर अधिक सक्षम आणि गतिशील बनवण्यात आली आहे. सर्व योजनांसाठी एकसंध सिंगल प्लॅटफॉर्म तयार केला जात आहे. पारदर्शकता आणि कार्यक्षमता हे आमचे प्रमुख ध्येय आहे.”
ते पुढे म्हणाले, “ही व्यवस्था विश्वास आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून उभी करण्यात आली आहे. या निधीचा योग्य वापर होणे अत्यंत गरजेचे आहे, आणि दुरुपयोग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे.”

आज या कक्षाच्या कामात अनेक ट्रस्ट्सनी सहभाग नोंदवला आहे. याच माध्यमातून खासगी रुग्णालयांतील महागड्या शस्त्रक्रिया देखील आता शक्य होत आहेत. विशेष म्हणजे, FCRA (Foreign Contribution (Regulation) Act, 2010) प्रमाणपत्र प्राप्त करणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा देशातील पहिलाच कक्ष ठरला आहे, ज्यामुळे आता विदेशी निधीचाही उपयोग वैद्यकीय मदतीसाठी करता येणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेवटी सर्व कर्मचाऱ्यांना उद्देशून आवाहन केले, “ही कार्यशाळा ही केवळ प्रशिक्षण नसून एक उद्दिष्ट स्पष्ट करणारी प्रेरणा आहे. समाजातील प्रत्येक गरजू रुग्णाला वेळेवर आणि योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हा त्याचा हक्क आहे, ही भावना मनात ठेवून आपण सर्वांनी एकजुटीने काम करायला हवे.” यावेळी मंत्री गिरीष महाजन, आ. सीमा हिरे, आ. राहुल ढिकले व इतर मान्यवर उपस्थित होते.

Maharashtra #DevendraFadnavis #Nashik

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *