७८ वर्षांची प्रतीक्षा संपली, गावात पहिल्यांदाच पोहोचली एसटी बस..

गडचिरोली दि २५:– स्वातंत्र्यानंतर तब्बल ७८ वर्षांनी गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम कटेझरी गावात एसटी बसचा पहिला प्रवास झाला. गडचिरोली पोलिस दलाच्या प्रयत्नातून आणि राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्याने ही ऐतिहासिक सेवा सुरू झाली. गावात बस येताच नागरिकांनी वाजतगाजत स्वागत केलं आणि गावात उत्सवाचं वातावरण पाहायला मिळालं.
गडचिरोली जिल्ह्यातील कटेझरी गावात, जिथे इतिहास घडला आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच इथं एसटी बस पोहोचली आहे. इथले नागरिक, आदिवासी बांधव, लहान मुलं, वयोवृद्ध – सगळे जण अक्षरशः डोळ्यात आनंदाश्रू घेऊन त्यांनी बसचं स्वागत केलं . गावात बस आल्याचा आनंद इतका मोठा आहे की, गावकरी पारंपरिक वाद्यांच्या गजरात बसचं स्वागत करत होते. हे फक्त प्रवासाचे नव्हे, तर विकासाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.
या सेवेचं उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांच्या हस्ते पार पडलं. प्रभारी अधिकारी पो.उ.नि. अजय भोसले यांनी हिरवा झेंडा दाखवत बस मार्गस्थ केली. या सेवेचा लाभ केवळ कटेझरीलाच नाही तर परिसरातील १० ते १२ गावांना होणार आहे. विद्यार्थ्यांना आता शिक्षणासाठी गावाबाहेर जाणं सोपं होणार आहे, तर स्थानिकांना तहसील आणि जिल्हा ठिकाणी प्रवासासाठी अधिक सुलभता मिळणार आहे. गडचिरोली पोलिस दलाचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून, व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही बस सेवा प्रत्यक्षात आली आहे.