CBSC शाळांच्या कॅम्पसमध्ये स्थापन होणार ‘शुगर बोर्ड’

नवी दिल्ली, दि. १८ : CBSE ने आपल्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांना त्यांच्या कॅम्पसमध्ये ‘शुगर बोर्ड’ (Sugar Boards) स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये साखरेच्या अतिसेवनामुळे होणाऱ्या आरोग्याच्या धोक्यांविषयी जागरूकता निर्माण करणे हा यामागचा उद्देश आहे. CBSE ने शाळांना या उपक्रमांचे छायाचित्रांसह एक संक्षिप्त अहवाल १५ जुलै २०२५ पर्यंत PDF स्वरूपात सादर करण्यास सांगितले आहे.
हा निर्णय शाळांमध्ये सहज उपलब्ध होणारे साखरयुक्त स्नॅक्स, शीतपेये आणि प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ यांच्यामुळे शालेय वयातील मुलांमध्ये टाइप २ मधुमेह, लठ्ठपणा, दातांच्या समस्या आणि इतर चयापचय संबंधी विकारांमध्ये होत असलेल्या वाढत्या धोक्यावर लक्ष केंद्रित करतो.
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (NCPCR) यासंदर्भात शिफारस केली होती, ज्यामध्ये मुलांमध्ये टाइप २ मधुमेह, लठ्ठपणा आणि दातांच्या समस्या वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती.
CBSE ने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, “साखरेच्या अतिसेवनामुळे केवळ मधुमेहाचा धोका वाढत नाही, तर लठ्ठपणा, दातांच्या समस्या आणि इतर चयापचय संबंधी (विकार देखील वाढतात, ज्याचा मुलांच्या दीर्घकालीन आरोग्य आणि शैक्षणिक कामगिरीवर परिणाम होतो. अभ्यासातून असे दिसून आले आहे की ४ ते १० वर्षे वयोगटातील मुलांच्या दैनंदिन कॅलरी सेवनात साखरेचे प्रमाण १३% असते, तर ११ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये ते १५% असते, जे शिफारस केलेल्या ५% च्या मर्यादेपेक्षा खूप जास्त आहे.”