महाराष्ट्राच्या पदकांचे शतक, विक्रमांची सप्तमी

पाटना (बिहार) दि १३ :– तब्बल ७ स्पर्धा विक्रमाची नोंद करीत ७ व्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राने पदकांचे शतक झळकावले. ४१ सुवर्णांसह एकूण १०१ पदकांची लयलूट करीत महाराष्ट्र पदकतालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे. वेटलिफ्टिंग पाठोपाठ ॲथलेटिक्समध्येही स्पर्धा विक्रमाला गवसणी घालत महाराष्ट्राच्या क्रीडापटूंनी खेलो इंडिया स्पर्धेत आपले वर्चस्व कायम राखले आहे.
स्पर्धेच्या ९ व्या दिवशी महाराष्ट्राने पदकाचे शतक झळकविण्याचा पराक्रम सलग दुसऱ्या स्पर्धेत केला. ४१ सुवर्ण, ३२ रौप्य व २८ कांस्य पदकाची कमाई करीत एकूण १०१ पदकाचा पल्ला महाराष्ट्राने गाठला आहे. महाराष्ट्राच्या पाठोपाठ राजस्थान, कर्नाटक व हरियाणा यांची क्रमवारी आहे. नवव्या दिवशी सकाळच्या सत्रात जिम्नॅस्टिकमध्ये महाराष्ट्राने ५ सुवर्णांसह १० पदके जिंकून पदकांचे शतक पूर्ण केले.
स्पर्धा विक्रमातही महाराष्ट्र आघाडीवर आहे. वेटलिफ्टिंग अस्मिता ढोणेने २ , साईराज परदेशीने ३, ॲथलेटिक्समध्ये सैफ चाफेकर, रोहित बिन्नार यांनी प्रत्येकी १ असे एकूण ७ स्पर्धा विक्रम प्रथमच खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या नावापुढे झळकले आहे. कराडच्या अस्मिता ढोणेने ४९ किलो वजनी गटात क्लिन व जर्कमध्ये ७३, एकूण १६२ किलोची कामगिरी करीत नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविला. मनमाडच्या साईराज परदेशीने विक्रमाची हॅटट्रिक केली. साईराजचे ८१ किलो वजनी गटात स्नॅचमध्ये १३९ किलो, क्लिन व जर्कमध्ये १७१, एकूण ३११ किलो असे ३ विक्रमाची नोंद केली. गत तामिळनाडू स्पर्धेतही साईराजचे स्पर्धा विक्रमाचा पराक्रम केला होता.
ॲथलेटिक्समध्ये आहिल्यानगर रोहित बिन्नारने ३००० मीटर धावणे शर्यतीत ८.२४.९ मिनिटांची वेळात सुवर्ण धाव घेत नवा स्पर्धा विक्रमाचे शिखर गाठले. ११० मीटर अडथळा शर्यतीत मुंबईच्या सैफ चाफेकरने १३.४८ सेकंदाची विक्रमी धाव घेतली. स्पर्धेत १० पेक्षा अधिक विक्रम महाराष्ट्राच्या नावापुढे झळकतील असा विश्वास पथकप्रमुख महादेव कसगावडे यांनी व्यक्त केला आहे.
ML/MS