गडचिरोलीमध्ये मोठी कारवाई : नक्षलवादी छावणी उद्ध्वस्त, शस्त्रसाठा जप्त..

गडचिरोली दि १२:–
गडचिरोली जिल्ह्यातील महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नक्षलविरोधी मोहिमेअंतर्गत गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. भामरागड दलमने नव्याने सुरू झालेल्या कावंडे फॉरवर्ड ऑपरेटिंग बेस (FOB) जवळ जंगलात छावणी उभारल्याची खात्रीशीर गुप्त माहिती पोलिसांना काल (११ मे) दुपारी मिळाली होती.
या माहितीच्या आधारे अतिरिक्त पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली सुमारे २०० कमांडोंच्या ‘सी-६०’ पथकाने सायंकाळी मोठ्या प्रमाणावर ऑपरेशन राबवले. आज (१२ मे) सकाळी जंगलात क्षेत्र शोधमोहीम सुरू असताना नक्षलवाद्यांनी अचानकपणे अंदाधुंद गोळीबार सुरू केला. सी-६० कमांडोंनीही तात्काळ प्रत्युत्तर देत जोरदार प्रतिकार केला. जवळपास दोन तासांच्या कालावधीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी नक्षलवाद्यांशी चकमक झाली.
चकमकीनंतर परिसरात करण्यात आलेल्या शोध मोहीमेदरम्यान पोलिसांनी दोन शस्त्रे – एक INSAS रायफल आणि एक सिंगल शॉट रायफल, एक मॅगझीन, अनेक जिवंत राऊंड्स, डेटोनेटर, एक वॉकीटॉकी, तीन पिट्ठू, वायरलेस चार्जर, मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य व वैयक्तिक वस्तू जप्त केल्या आहेत. सी-६० कमांडोंनी नक्षलवादी छावणी पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे.
या कारवाईत काही नक्षलवादी जखमी अथवा ठार झाल्याची शक्यता असून त्यांचे सहकारी त्यांना जंगलात घेऊन गेले असावेत, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
सध्या या भागात शोधमोहीम सुरूच असून पुढील तपशील लवकरच अधिकृत निवेदनाद्वारे देण्यात येणार आहे.
ML/MS