अकोल्याच्या तरूणाच्या लघुपटाची ‘कान्स’साठी निवड

 अकोल्याच्या तरूणाच्या लघुपटाची ‘कान्स’साठी निवड

अकोला दि ९:– अकोल्याच्या तरूणाने निर्माण केलेल्या ‘अ डॉल मेड अप ऑफ क्ले’ या लघुपटाची जगप्रसिद्ध कान्स चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली आहे. साहिल इंगळे असे या तरूणाचे नाव असून, ‘कान्स’साठी यंदा निवड झालेला हा देशातील एकमेव लघुपट ठरला आहे.
केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत कोलकात्याच्या सत्यजीत रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये साहिल इंगळे ‘प्रोड्युसिंग फॉर फिल्म अँड टेलिव्हिजन’ या कोर्सचे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. अ डॉल मेड अप ऑफ क्ले’ हा चित्रपट बंगाली भाषेबरोबरच युरोबा या नायजेरियाच्या भाषेत निर्माण करण्यात आला आहे. ही साहिल इंगळे याची निर्मिती असून, इथोओपियाचा तरूण विद्यार्थी कोकोब गब्रवारिया टेस्फे याने लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे.

एक नायजेरियन तरूण खेळाडू भारतात फुटबॉलपटू म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी वडीलांची शेती विकतो. त्याचे स्वप्न पूर्ण होण्यात येणारे अडथळे व प्रयत्न यांची ही कहाणी आहे. चित्रीकरणासाठी केवळ इन्स्टिट्यूटची साधने वापरली. बाकी खर्च शून्य झाला. कुठल्याही आर्थिक मदतीशिवाय हा चित्रपट पूर्ण झाला. इच्छा असेल तर अल्प साधनांतही चांगला चित्रपट निर्माण करता येतो, अशी प्रतिक्रिया साहिल इंगळे याने व्यक्त केली आहे.
साहिल इंगळे याने पुणे विद्यापीठातून जनसंज्ञापन विषयात पदवी घेतली आहे. जनसंज्ञापनात चित्रपटाची ताकद काय असते, याची जाणीव झाल्यावर आपण चित्रपट शिक्षणाकडे वळलो. देशातील चित्रपट शिक्षण देणा-या संस्थांकडून आलेल्या २ हजार ७०० हून अधिक चित्रपटांतून केवळ १६ चित्रपटांची निवड झाली. लघुपट या श्रेणीत निवडला गेलेला आमचा देशातील एकमेव चित्रपट आहे, असे साहिल इंगळे याने सांगितले. या चित्रपटात बांगलादेश नायजेरिया इथोपिया येथील विद्यार्थ्यांनी काम केले असून त्याची नोंद आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील कांस फिल्म फेस्टिवल मध्ये होत असल्यामुळे ही निश्चितच भारत देशासाठी अभिमानाची बाब आहे.

अकोल्यातून मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या साहिल इंगळे यांचे वडील सैन्य दलातून सेवानिवृत्त झाले असून मुलाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचल्यामुळे हा कुटुंबासाठी अभिमानाचा क्षण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. लहानपणापासून साहिल इंगळे यांना चित्रपट पत्रकारितेची आवड होती त्याची स्वप्न पूर्ण होत असताना बघण्याचा आनंद अभिमान वाटणारा आहे अशी भावना साहिल इंगळे यांचा आईने व्यक्त केली.

फ्रान्स येथे होणाऱ्या जगप्रसिद्ध कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये संधी मिळावी ही प्रत्येक कलाकार तंत्रज्ञ दिग्दर्शक निर्मात्यांचे स्वप्न असते यावेळी केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत चालवल्या जाणाऱ्या कोलकात्याच्या सत्यजीत रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमधून निर्माण झालेला अ डॉल मेड अप ऑफ क्ले’लघुपट आंतरराष्ट्रीय फेस्टिवल मध्ये पोहोचणारा एकमेव चित्रपट ठरला असून केंद्र शासनाने कायम विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहून उपलब्ध करून दिलेली ही संधी निश्चितच भविष्यातील चित्रपटसृष्टीची प्रेरणादायी नांदी ठरेल हे निश्चित.
ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *